गोलंदाजी सुधारण्याचे आव्हान!

गोलंदाजी सुधारण्याचे आव्हान!

गोलंदाजांची खराब कामगिरी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला बसला. चेन्नई येथे झालेला हा सामना विंडीजने ८ विकेट राखून जिंकत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला विशाखापट्टणम येथे बुधवारी होणारा दुसरा सामना जिंकणे अनिवार्य आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताच्या गोलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात चेन्नईतील संथ खेळपट्टीवर भारताने प्रथम फलंदाजीत २८७ धावा उभारल्या. मात्र, गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने विंडीजने हे आव्हान अवघ्या दोन विकेट गमावत पूर्ण केले. विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियममधील खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल मानली जाते. या खेळपट्टीवर ३२० इतकी धावसंख्या सहज पार होऊ शकेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे विंडीजच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे कठीण आव्हान आहे.

शिमरॉन हेटमायर आणि शाई होप या दोन युवा फलंदाजांनी अप्रतिम शतके करत विंडीजला या मालिकेत आघाडी मिळवून दिली. या सामन्यात रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीला २० षटकांत एकही विकेट मिळवता आली नाही, तर त्यांनी १०३ धावा खर्ची केल्या. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात लेगस्पिनर युजवेंद्र चहलचे संघात पुनरागमन होऊ शकेल. तसेच अष्टपैलू शिवम दुबेला पदार्पणात आपली छाप पाडता आली नाही. त्याच्या गोलंदाजीवर विंडीज फलंदाजांनी ७.५ षटकांत ६८ धावा काढल्या. त्यामुळे त्यानेही आपल्या गोलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे. भारताने पहिला सामना गमावला असला तरी दुसर्‍या सामन्यात संघात फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारताच्या संघात राखीव सलामीवीर म्हणून मयांक अगरवालची निवड करण्यात आली होती. मात्र, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात असल्यामुळे त्याला पदार्पणाच्या संधीसाठी वाट पाहावी लागेल. तसेच केदार जाधव आपले संघातील कायम राखणार हेसुद्धा जवळपास निश्चितच आहे. केदारने पहिल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत ३३ चेंडूत ४० धावांची खेळी केली होती. त्याला या सामन्यात केवळ एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. परंतु, दुसर्‍या सामन्यात तो आणखी षटके टाकू शकेल.

दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेल आणि अल्झारी जोसेफ या वेगवान गोलंदाजांनी चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये अडचणीत टाकले. त्यांना किमो पॉलने चांगली साथ दिली. मात्र, विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर विराट कोहली, रोहित, राहुल, श्रेयस अय्यर यांना रोखताना या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. एकूणच दुसर्‍या सामन्यात ज्या संघाचे गोलंदाज सर्वोत्तम कामगिरी करतील, तो संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, मयांक अगरवाल, मनीष पांडे, शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनिल अँब्रिस, शाई होप, खेरी पिएर, रॉस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रोमॅरिओ शेपर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनिअर.

सामन्याची वेळ – दुपारी १:३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

First Published on: December 18, 2019 3:24 AM
Exit mobile version