भारत अ संघाच्या विजयात सूर्यकुमार, ऋतुराजची चमक

भारत अ संघाच्या विजयात सूर्यकुमार, ऋतुराजची चमक

ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या अप्रतिम फलंदाजीमुळे भारत अ संघाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड इलेव्हन संघावर ९२ धावांनी मात केली. भारत अ संघ न्यूझीलंड दौर्‍यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी भारत अ संघाचे दोन सराव सामने होणार असून त्यापैकी पहिला सामना त्यांनी सहजपणे जिंकला.

या सामन्यात न्यूझीलंड इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयांक अगरवालला (८) फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मात्र, कर्णधार शुभमन गिल (६६ चेंडूत ५०) आणि ऋतुराज गायकवाड (१०३ चेंडूत ९३) यांनी भारत अ संघाचा डाव सावरला. त्यांनी दुसर्‍या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. ते दोघे बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (४८ चेंडूत ५०) आणि कृणाल पांड्या (३१ चेंडूत ४१) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे भारत अ संघाने ५० षटकांत ८ बाद २७९ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना सलामीवीर जेकब भुला आणि जॅक बॉयल यांनी न्यूझीलंड इलेव्हनच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. त्यांनी १७ षटकांत ८२ धावांची सलामी दिली. मात्र, विजय शंकरने बॉयलचा (४२) त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. तर भुलाला ५० धावांवर कृणाल पांड्याने बाद केले. पुढे डेन क्लेव्हर (३३) वगळता इतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे न्यूझीलंड इलेव्हन संघाचा डाव १८७ धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक – भारत अ : ५० षटकांत ८ बाद २७९ (ऋतुराज ९३, सूर्यकुमार ५०, गिल ५०; गिब्सन ४/५१) विजयी वि. न्यूझीलंड इलेव्हन : ४१.१ षटकांत सर्वबाद १८७ (भुला ५०; खलील ४/४३, सिराज २/३३, कृणाल २/५१).

First Published on: January 18, 2020 5:33 AM
Exit mobile version