भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केवळ एका मैदनावरही होऊ शकेल!

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केवळ एका मैदनावरही होऊ शकेल!

करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षाच्या अखेरीस होणार्‍या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाले. या वेळापत्रकानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामने ब्रिस्बन (३-७ डिसेंबर), अ‍ॅडलेड (११-१५ डिसेंबर), मेलबर्न (२६-३० डिसेंबर) आणि सिडनी (३-७ जानेवारी) येथे होणार आहेत. परंतु, पुढील काळातील परिस्थिती आणि प्रवासावरील निर्बंध या गोष्टी लक्षात घेऊन या वेळापत्रकात बदलही होऊ शकेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले.

स्थानिक प्रवासावरील निर्बंध उठतील असा विचार करुन आम्ही हे वेळापत्रक आखले आहे. मात्र, आम्ही पुढील परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ. ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेतील सामने कदाचित एक किंवा दोन मैदानावरही होऊ शकतील. आताच काहीही सांगणे अवघड आहे. चार राज्यांतील चार मैदानांवर सामने होणार का, हे विविध गोष्टींवर अवलंबून आहे. याबाबत अजून विचार करावा लागू शकेल. आताच कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, असे रॉबर्ट्स यांनी सांगितले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा एकही सामना पर्थमध्ये होणार नसल्याची वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा क्रिस्टिना मॅथ्यूज यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ब्रिस्बनमध्ये कसोटी सामना न झाल्याने यंदा त्यांना सामन्याच्या आयोजनाची संधी दिली आहे, असे रॉबर्ट्स यांनी स्पष्ट केले. तसेच यंदाचा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ८० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल असेही रॉबर्ट्स म्हणाले.

First Published on: May 30, 2020 4:19 AM
Exit mobile version