कुणालने घेतली किवींची फिरकी

कुणालने घेतली किवींची फिरकी

Krunal Pandya

कृणाल पांड्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ विकेट राखून मात केली. भारताच्या या विजयामुळे ३ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. पहिला टी-२० सामना न्यूझीलंडने ८० धावांनी जिंकला होता. या मालिकेतील तिसरा आणि आणि निर्णायक सामना १० फेब्रुवारीला हॅमिल्टन येथे होणार आहे.
दुसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. मागील सामन्यात मॅचविनिंग खेळी करणार्‍या टीम सायफर्टला या सामन्यात अवघ्या १२ धावाच करता आल्या. त्याला भुवनेश्वर कुमारने महेंद्रसिंग धोनीकरवी बाद केले. यानंतर डावखुरा फिरकीपटू कृणाल पांड्याने आपली जादू दाखवली. त्याने कॉलिन मुनरो (१२), डॅरेल मिचेल (१) आणि केन विल्यम्सन (२०) यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे न्यूझीलंडची आठव्या षटकात ४ बाद ५० अशी अवस्था होती, पण यानंतर कॉलिन डी ग्रँडहोम आणि अनुभवी रॉस टेलरने न्यूझीलंडचा डाव सावरला.

डी ग्रँडहोमने युझवेंद्र चहल आणि कृणाल यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या डावाच्या १६ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर २ धावा काढत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने २८ चेंडूंत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. तसेच त्याने आणि टेलरने मिळून पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतर टेलरने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भुवनेश्वर आणि खलील अहमद यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत त्याला वेगाने धावा करू दिल्या नाहीत. तो ४२ धावांवर असताना धावचीत झाला. त्याने या धावा ३६ चेंडूंत केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. त्यांनी २० षटकांत ८ बाद १५८ इतकी धावसंख्या उभारली. भारताकडून कृणालने २८ धावा देत ३ विकेट घेतल्या.

१५८ धावांचा पाठलाग करताना भारताची दमदार सुरुवात झाली. मागील सामन्यात अवघी १ धाव करून बाद झालेल्या रोहित शर्मा या सामन्यात मात्र चांगलीच फटकेबाजी केली, त्याला शिखर धवनने चांगली साथ दिली. ३३ धावांवर असताना लेगस्पिनर ईश सोधीला षटकार लगावत रोहित टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला, तर पुढच्या षटकात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हे अर्धशतक अवघ्या २७ चेंडूंत पूर्ण केले, मात्र अर्धशतक झाल्यावर लगेचच तो बाद झाला. त्याला सोधीने बाद केले. त्याने आणि धवनने ७९ धावांची भागीदारी केली. पुढच्या षटकात धवनला लोकी फर्ग्युसनने ३० धावांवर माघारी पाठवले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विजय शंकर फारकाळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. तो बाद झाला तेव्हा भारताला जिंकण्यासाठी ३८ चेंडूंत ४१ धावांची गरज होती. रिषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनी यांनी या धावा ७ चेंडू बाकी असताना पूर्ण करून भारताला विजय मिळवून दिला. पंतने २८ चेंडूंत ४० तर धोनीने १७ चेंडूंत २० धावा केल्या.

या सामन्याच्या सहाव्या षटकात डॅरेल मिचेलला कृणाल पांड्याने पायचीत केले, मात्र त्याला पंचांचा निर्णय अयोग्य वाटल्याने त्याने डीआरएसची मदत घेतली. रिव्युव्हमध्ये चेंडू पॅडला लागण्याआधी बॅटला लागल्याचे दिसत होते. असे असतानाही तिसर्‍या पंचांनी मिचेलला बाद ठरवले. त्यामुळे मैदानावर चांगलाच गोंधळ उडाला. कर्णधार केन विल्यम्सन आणि मिचेल यांनी या निर्णयाबाबत मैदानावर तीव्र नाराजी व्यक्त केली, मात्र तिसर्‍या पंचांनी निर्णय दिला असल्याने मिचेलला मैदानाबाहेर जावेच लागले.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १५८ (कॉलिन डी ग्रँडहोम ५०, रॉस टेलर ४२; कृणाल पांड्या ३/२८, खलील अहमद २/२७) पराभूत वि. भारत १८.५ षटकांत ३ बाद १६२ (रोहित शर्मा ५०, रिषभ पंत ४०, शिखर धवन ३०; डॅरेल मिचेल १/१५).

First Published on: February 9, 2019 4:51 AM
Exit mobile version