कांगारुंची बाजी!

कांगारुंची बाजी!

मधल्या फळीतील आणि तळाच्या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे भारतीय महिला संघ टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने हा सामना ११ धावांनी जिंकत ही मालिका जिंकली. या सामन्यात १५६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ पंधराव्या षटकात ३ बाद ११५ असा सुस्थितीत होता. मात्र, यानंतर डावखुरी फिरकीपटू जेस जोनासनने ५ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे भारताचा डाव १४४ धावांत आटोपला. टी-२० क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारी जोनासन ही ऑस्ट्रेलियाची केवळ तिसरी महिला गोलंदाज आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. ऑफस्पिनर दिप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अलिसा हिलीला पहिल्याच षटकात ४ धावांवर बाद केले. बेथ मुनी आणि अ‍ॅशली गार्डनर यांनी ५२ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मात्र, गार्डनरला २६ धावांवर अरुंधती रेड्डीने माघारी पाठवत ही जोडी फोडली. यानंतर मुनीला कर्णधार लॅनिंगची उत्तम साथ लाभली.

या दोघींनी तिसर्‍या विकेटसाठी ५१ धावा जोडल्यावर राधा यादवने लॅनिंगला २६ धावांवर माघारी पाठवले. मुनीने मात्र आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवत ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकांत तिने आणि रेचल हेन्सने (७ चेंडूत १८) केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १५५ अशी धावसंख्या उभारली. मुनीने ५४ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.

१५६ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एका बाजूने विकेट पडत असताना मानधनाने दुसरी बाजू लावून धरत ३७ चेंडूत १२ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. तिला मेगन शूटने बाद केली. ती बाद झाली तेव्हा पंधराव्या षटकात भारताची ४ बाद ११५ अशी धावसंख्या होती. यानंतर जोनासनच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांना निभाव लागला नाही. मानधना आणि पदार्पण करणारी रिचा घोष (१७) वगळता भारताकडून एकीलाही १५ धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे भारताचा डाव १४४ धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १५५ (बेथ मुनी नाबाद ७१, अ‍ॅशली गार्डनर २६, मेग लॅनिंग २६; दिप्ती शर्मा २/३०, राजेश्वरी गायकवाड २/३२) विजयी वि. भारत : २० षटकांत सर्वबाद १४४ (स्मृती मानधना ६६, रिचा घोष १७; जेस जोनासन ५/१२).

अखेरच्या षटकांत आम्हाला दबाव हाताळता आला नाही – हरमनप्रीत
भारताला अंतिम सामन्यात जिंकण्यासाठी अखेरच्या ३० चेंडूत ३९ धावांची आवश्यकता होती. या धावा सहजपणे झाल्या पाहिजे होत्या, पण आम्हाला दबाव हाताळता आला नाही, असे सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली. या सामन्यात आणि मालिकेत आम्हाला खूप शिकायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता आम्ही अधिक आत्मविश्वासाने खेळतो. या सामन्यात आम्हाला जिंकण्याची संधी होती, अखेरच्या षटकांत आम्हाला दबाव हाताळता आला नाही, असे हरमनप्रीतने नमूद केले.

First Published on: February 13, 2020 6:06 AM
Exit mobile version