IND vs ENG : पंत, सुंदरची दमदार खेळी; पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी 

IND vs ENG : पंत, सुंदरची दमदार खेळी; पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी 

रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर

रिषभ पंतचे शतक, तसेच वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी मिळाली. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर भारताची ७ बाद २९४ अशी धावसंख्या होती. त्यामुळे भारताकडे ८९ धावांची आघाडी होती. या कसोटीचा दुसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतसाठी खास ठरला. त्याने ११८ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील तिसरे आणि भारतातील पहिलेच शतक ठरले. त्याला वॉशिंग्टन सुंदरने उत्तम साथ लाभली. दिवसअखेर तो ६० धावांवर नाबाद होता. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने तीन, तर बेन स्टोक्स आणि जॅक लिच यांनी दोन-दोन विकेट घेतल्या.

रोहितचे अर्धशतक हुकले 

दुसऱ्या दिवशी भारताने १ बाद २४ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा (१७) आणि कर्णधार विराट कोहली (०) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. अजिंक्य रहाणेने काही चांगले फटके मारत ४५ चेंडूत २७ धावा केल्यावर त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. यानंतर रोहित शर्मा आणि पंत यांनी ४१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. रोहितचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याला ४९ धावांवर बेन स्टोक्सने पायचीत पकडले. परंतु, पंत आणि सुंदर यांनी ११३ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पंतने ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, तो १०१ धावांवर बाद झाला. अखेर सुंदर (नाबाद ६०) आणि अक्षर पटेल (नाबाद ११) यांनी चांगली फलंदाजी केल्याने भारताने आणखी विकेट गमावली नाही.

First Published on: March 5, 2021 5:57 PM
Exit mobile version