भारतीय फलंदाजांना खेळात सुधार करण्याची गरज – इयन चॅपल

भारतीय फलंदाजांना खेळात सुधार करण्याची गरज – इयन चॅपल

सौजन्य - The Australian

नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयन चॅपल यांच्यामते जर भारताला या मालिकेत जिंकायचे असेल तर भारतीय फलंदाजांना खेळात सुधार करण्याची गरज आहे. अन्यथा ऑस्ट्रेलियाची ‘तगडी’ गोलंदाजी भारताच्या नाकीनऊ आणेल आणि भारताचा पुन्हा एकदा पराभव होईल.

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी घातक

इयन चॅपल म्हणाले, “स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर नसल्याने ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत आहे. पण त्यांची गोलंदाजी अजूनही तगडी आहे. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, जोश हॅझेलवूड, पॅट कमिन्स आणि नेथन लायन असे घातक गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी आपला खेळ सुधारण्याची गरज आहे. जर भारतीय फलंदाजांनी इंग्लंडमधील प्रदर्शन कायम ठेवले तर भारताला पराभवाला सामोरे जावे लागेल. इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली वगळता एकही फलंदाज सातत्यपूर्ण प्रदर्शन करू शकला नाही. पुजारा, रहाणे आणि लोकेश राहुल यांनी काही चांगल्या खेळी केल्या. पण ते पुरेसे नाही.”

रोहितवर भरोसा ठेवणे धोकादायक

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रोहित शर्माला पुन्हा एकदा कसोटी खेळण्याची संधी मिळावी असे काही क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. पण इयन चॅपल त्यापैकी एक नाहीत. भारत नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यात रोहितला संधी मिळण्याबाबत चॅपल म्हणाले, “रोहित एक उत्तम फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात तो चांगली फलंदाजी करू शकेल पण त्याला कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर भरोसा ठेवण्याआधी भारताला विचार करावा लागेल.”
सौजन्य – sportzwiki
First Published on: September 16, 2018 11:10 PM
Exit mobile version