भारताविरुद्ध संयमाने खेळण्याची गरज!

भारताविरुद्ध संयमाने खेळण्याची गरज!

इंग्लंडच्या जो रूटचे विधान

क्रिकेट विश्वचषकात मागील मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि यजमान इंग्लंडला धूळ चारली. त्यामुळे त्यांनी थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडला मात्र हा पराभव महागात पडू शकेल. या पराभवामुळे त्यांचे ७ सामन्यांत ८ गुण झाले असून त्यांना पुढील दोन सामने जिंकणे महत्त्वाचे झाले आहे.

त्यांचे हे दोन सामने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध होणार असल्याने इंग्लंडला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. हे सामने जिंकण्यासाठी आम्हाला संयमाने खेळण्याची गरज आहे, असे इंग्लंडचा फलंदाज जो रूट म्हणाला.

पुढील दोन सामन्यांत आम्हाला संयमाने खेळ करावा लागणार आहे. खासकरून भारताविरुद्ध एजबॅस्टन येथे होणार्‍या सामन्यात दोन्ही संघांचे चाहते गर्दी करतील. त्यामुळे संघांवरील दबावही वाढेल. या परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी संयम राखणे आवश्यक आहे. आम्ही अजूनही उपांत्य फेरी गाठू असा आम्हाला विश्वास आहे.

तुम्ही उपांत्य फेरी कशी गाठता हे महत्त्वाचे नसते. पुढील दोन सामने आमच्यासाठी उपांत्यपूर्व फेरीप्रमाणेच आहेत. त्यामुळे आम्ही हे सामने जिंकलो तर आमचा आत्मविश्वास वाढेल. विश्वचषकासारख्या स्पर्धेत तुम्हाला मोठे आणि कठीण सामने कधीतरी जिंकावेच लागतात, असे रूट म्हणाला.

First Published on: June 28, 2019 4:35 AM
Exit mobile version