IND vs ENG 3rd Test : पहिल्या डावातील पडझड अनपेक्षित; पराभवानंतर कर्णधार कोहलीची कबुली

IND vs ENG 3rd Test : पहिल्या डावातील पडझड अनपेक्षित; पराभवानंतर कर्णधार कोहलीची कबुली

कर्णधार विराट कोहली

पहिल्या डावातील पडझड अनपेक्षित आणि विचित्र होती, असे विधान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत भारतीय फलंदाजांवर सातत्याने दडपण टाकले. पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपल्यानंतर पुनरागमन करणे अवघड झाल्याचेही कोहलीने मान्य केले. हेडिंग्ले येथे झालेला तिसरा कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला. इंग्लंडने ४३२ धावांची मजल मारत पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी मिळवली. चांगल्या सुरुवातीनंतर दुसरा डाव २७८ धावांत संपुष्टात आल्याने भारताने हा सामना डावाने गमावला.

पुनरागमन करणे जवळपास अशक्यच

आमच्यावर धावफलकामुळे दडपण आले. पहिल्या डावात तुम्ही ८० हूनही कमी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ जेव्हा मोठी धावसंख्या उभारतो, तेव्हा तुम्हाला पुनरागमन करणे जवळपास अशक्यच होते. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात आम्ही चांगली झुंज दिली. त्यामुळे आम्हाला सामना वाचवण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु, आज (चौथ्या दिवशी) इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आमच्या फलंदाजांवर सातत्याने दडपण टाकले. त्यामुळे त्यांना अपेक्षित निकाल मिळाल्याचे सामन्यानंतर कोहली म्हणाला.

आमच्यावर सातत्याने दडपण टाकले

इंग्लंडमध्ये तुमचा डाव गडगडू शकतो. खेळपट्टीवर फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे आम्हाला वाटले होते. मात्र, इंग्लंडने शिस्तबद्ध गोलंदाजी करत आमच्यावर सातत्याने दडपण टाकले. आमच्या फलंदाजांना धावा करणे अवघड गेले. त्यामुळे आमची पडझड झाली, असेही कोहलीने नमूद केले. तसेच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा होता, असे कोहलीला वाटत नाही.


हेही वाचा – फलंदाजांची उडाली दाणादाण; तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया डावाने पराभूत


 

First Published on: August 28, 2021 9:20 PM
Exit mobile version