IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत कोहलीचे ‘विराट’ खेळीचे लक्ष्य!

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत कोहलीचे ‘विराट’ खेळीचे लक्ष्य!

विराट कोहली मोठी खेळी करणार?

लॉर्ड्स कसोटीतील अविस्मरणीय विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाला बुधवारपासून सुरु होणारा तिसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याची संधी मिळणार आहे. नॉटिंगहॅम येथे झालेला या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. परंतु, दुसऱ्या कसोटीत भारताने उत्कृष्ट खेळ करत १५१ धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे हेडिंग्ले येथे होणारा तिसरा कसोटी सामना जिंकत मालिकेवरील पकड अधिक मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तसेच या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचेही मोठी खेळी करण्याचे लक्ष्य असेल.

दमदार कामगिरीचा प्रयत्न

कोहलीला मागील काही काळात धावांसाठी झुंजावे लागले आहे. त्याला नोव्हेंबर २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करता आलेले नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीच्या तीन डावांत मिळून केवळ ६२ धावा केल्या. तसेच या सामन्यांत तो तांत्रिकदृष्ट्याही चुका करताना दिसला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू मारण्याचा मोह त्याला काही वेळा आवरता आला नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत कोहलीचा फलंदाजीच्या तंत्रामध्ये सुधारणा करून दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.

भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमी

भारताने दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट खेळ केला. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात खेळ उंचावला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी चांगली कामगिरी सुरु ठेवली. या मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी फलंदाजांबाबत बरीच चर्चा झाली होती. परंतु, त्यांनी लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात १०० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यांना आता कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे. गोलंदाजांनी भेदक मारा करताना फलंदाजीतही योगदान दिले. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.


हेही वाचा – लॉर्ड्स कसोटीत त्याचा मला बाद करण्याचा प्रयत्न नव्हता; अँडरसनची बुमराहवर टीका


 

First Published on: August 24, 2021 10:30 PM
Exit mobile version