IND vs ENG 3rd Test : टीकाकारांकडे दुर्लक्ष करून केवळ खेळावर लक्ष केंद्रीत केल्याचा फायदा झाला – अँडरसन

IND vs ENG 3rd Test : टीकाकारांकडे दुर्लक्ष करून केवळ खेळावर लक्ष केंद्रीत केल्याचा फायदा झाला – अँडरसन

जेम्स अँडरसनचा भेदक मारा

लॉर्ड्स कसोटीतील निराशाजनक कामगिरीनंतर तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने उत्कृष्ट खेळ केला. या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला. इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सुरुवातीपासूनच अप्रतिम स्विंग गोलंदाजी करत भारताला अडचणीत टाकले. त्याने भारताच्या पहिल्या तिन्ही विकेट घेतल्या. लॉर्ड्स कसोटीत अँडरसनसह इंग्लंडच्या अन्य काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा भारतालाच फायदा झाला. त्यामुळे त्या कसोटीनंतर इंग्लंडच्या संघावर बरीच टीका झाली. परंतु, तिसऱ्या कसोटीत टीकाकारांकडे दुर्लक्ष करून केवळ खेळावर लक्ष केंद्रीत केल्याचा आम्हाला फायदा झाल्याचे अँडरसन म्हणाला.

सामन्यापूर्वी याबाबत चर्चाही केली

केवळ आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो त्याचा विचार करून आम्ही टीकाकारांकडे दुर्लक्ष केले. आम्ही सामन्यापूर्वी याबाबत चर्चाही केली होती. आम्ही केवळ खेळावर आणि कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत चर्चा केली. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या तीन-चार दिवसांत आम्ही उत्कृष्ट खेळ केला होता. आमची शाब्दिक चकमक वैगरेही झाली नव्हती. मात्र, त्यानंतर काही गोष्टी घडल्या आणि याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला. हे आम्हाला तिसऱ्या कसोटीत टाळायचे आहे, असे अँडरसनने सांगितले.

कोहलीला लवकर बाद करण्याचा प्रयत्न 

अँडरसनने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीची तब्बल सातव्यांदा विकेट घेतली. याबाबत विचारले असता अँडरसन म्हणाला, ही कामगिरी नक्कीच खूप खास आहे. कोहली उत्कृष्ट फलंदाज आहे आणि संघ म्हणून तुम्हाला त्याला लवकर बाद करायचे असते. विशेषतः पाच सामन्यांच्या कसोटीत मालिकेत त्याच्यासारख्या खेळाडूला मोठ्या खेळी करू न देण्याचा तुमचा प्रयत्न असतो. त्याने चांगली कामगिरी केल्यास त्याच्या संघाचे मनोबल वाढते आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण येते. आम्ही या मालिकेत त्याच्याविरुद्ध योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आहे.


हेही वाचा –  इंग्लिश चाहत्यांची पुन्हा बेशिस्त वागणूक; सिराजला फेकून मारला बॉल


 

First Published on: August 26, 2021 5:28 PM
Exit mobile version