IND vs ENG : पुजाराने अधिक फटके मारण्याचा प्रयत्न करावा; ब्रायन लाराचा सल्ला

IND vs ENG : पुजाराने अधिक फटके मारण्याचा प्रयत्न करावा; ब्रायन लाराचा सल्ला

चेतेश्वर पुजाराने अधिक फटके मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे

भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला मागील काही काळात मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. पुजारा ३६ कसोटी डावांत शतक करू शकलेला नाही. लॉर्ड्सवर झालेल्या इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पुजाराने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र, ही खेळी करताना त्याने २०६ चेंडू खेळून काढले. पुजारा सावध आणि संथ गतीने फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु, पुजाराला कामगिरीत सुधारणा करायची असल्यास त्याने अधिक फटके मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केले.

फार संथ गतीने फलंदाजी करतो

पुजारा आणि माझ्या फलंदाजीच्या शैलीत बराच फरक आहे. मी त्याच्याइतक्या संयमाने फलंदाजी करू शकत नव्हतो. परंतु, मी त्याचा प्रशिक्षक असतो किंवा त्याला मार्गदर्शन करत असतो, तर त्याला अधिक वेगाने धावा करण्याचा सल्ला दिला असता. त्याने अधिक फटके मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुजारा त्याला दिलेली भूमिका चोख बजावतो. परंतु, तो फार संथ गतीने फलंदाजी करतो. तुम्ही जेव्हा इतक्या संथ गतीने खेळता, तेव्हा तुमच्यावरील दडपण वाढते, असे लारा म्हणाला.

 तिसऱ्या कसोटीतही पुजारा लवकर बाद

फलंदाज म्हणून तुम्ही संथ गतीने खेळ करत असल्यास गोलंदाजाला सातत्याने योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याची संधी मिळते. त्यामुळे गोलंदाज तुम्हाला अडचणीत टाकण्याची शक्यता वाढते, असे लाराने नमूद केले. पुजाराला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला केवळ एका धावेवर जेम्स अँडरसनने बाद केले.


हेही वाचा – फलंदाजांकडून निराशा; भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत गारद


 

First Published on: August 25, 2021 9:16 PM
Exit mobile version