IND vs ENG : विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…

IND vs ENG : विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…

विराट कोहलीला धावांसाठी झुंजावे लागत आहे

भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. परंतु, कोहलीला मागील काही काळात धावांसाठी झुंजावे लागले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीतही तो मोठी खेळी करू शकला नाही. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली खातेही उघडू शकला नाही. दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत चांगल्या सुरुवातीनंतर तो (४२ आणि २०) बाद झाला. त्यामुळे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कोहलीवर टीका केली आहे. कोहलीला सध्या चांगली फलंदाजी करण्यात अपयश येत असून तांत्रिकदृष्ट्याही तो चुका करत असल्याचे गावस्कर म्हणाले.

ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू मारतो 

कोहलीची धावा करण्याची वेगळी पद्धत आहे. गोलंदाज चेंडू टाकण्याआधी तो क्रीजमध्ये मागे आणि ऑफ स्टम्पच्या दिशेला जातो. या पद्धतीने फलंदाजी करतानाच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. परंतु, आता त्याने काही चुका करण्यास सुरुवात केली आहे. डावाच्या सुरुवातीलाच तो ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे पाय आणि बॅट वेगवेगळ्या दिशेने जात आहे. याचा अर्थ कोहली सध्या चांगली फलंदाजी करत नाहीये, असे गावस्कर म्हणाले.

समोरच्या दिशेने फटके मारले पाहिजेत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वच फलंदाज धावा करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आक्रमक शैलीत फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात फलंदाज अडचणीत सापडू शकतात. हेच आपल्याला कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये परिस्थिती वेगळी असते, पण कसोटीत फलंदाजाने समोरच्या दिशेने जास्तीतजास्त फटके मारले पाहिजेत. खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यावर तुम्ही फटकेबाजी करू शकता, असेही गावस्करांनी नमूद केले.


हेही वाचा – बुमराहला डिवचणाऱ्या अँडरसनला विराट कोहली मैदानात भिडला


 

First Published on: August 16, 2021 5:34 PM
Exit mobile version