पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ६ गडी राखून दमदार विजय

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ६ गडी राखून दमदार विजय
सलामीवीर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६ विकेट राखून मात केली. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला, तर मुंबईकर श्रेयस अय्यरने अवघ्या २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुनरो, टेलरची अर्धशतके 

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र, भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीला चांगली गोलंदाजी करता आली नाही. कॉलिन मुनरो (५९) आणि मार्टिन गप्टिल (३०) यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. अखेर गप्टिलला शिवम दुबेने, तर मुनरोला शार्दूल ठाकूरने बाद केले. यानंतर कर्णधार केन विल्यमसन (५१) आणि रॉस टेलर (नाबाद ५४) या अनुभवी फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करत न्यूझीलंडला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. त्यांनी २० षटकांत ५ बाद २०३ अशी मजल मारली.

अय्यरची दमदार खेळी 

२०४ धावांचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. मिचेल सँटनरने रोहित शर्माला अवघ्या ७ धावांवर बाद केले. यानंतर राहुल (५६) आणि कोहली (४५) या दुसऱ्या जोडीने भारताचा डाव सावरला. त्यांनी ९९ धावांची भागीदारी रचली. हे दोघे झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत आपले टी-२० क्रिकेटमधील सहावे अर्धशतक झळकावत भारताला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला.

First Published on: January 24, 2020 4:02 PM
Exit mobile version