विंडीजची मालिकेत बरोबरी; भारतावर ८ विकेट राखून मात

विंडीजची मालिकेत बरोबरी; भारतावर ८ विकेट राखून मात

सिमन्सच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर विंडीजचा विजय सुकर

लेंडल सिमन्सचे अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ विकेट आणि ९ चेंडू राखून मात केली. त्यामुळे विंडीजने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजीत ७ बाद १७० अशी मजल मारली होती, पण खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे भारताने हा सामना गमावला. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मुंबईत ११ डिसेंबरला होणार आहे.

तिरुअनंतपुरम येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. लोकेश राहुल केवळ ११ धावांवर डावखुरा फिरकीपटू खेरी पिएरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकांवर बढती मिळाली. त्याला आणि रोहित शर्माला धावफलक हलता ठेवता आला नाही. रोहितला १५ धावांवर जेसन होल्डरने माघारी पाठवले. दुबेने मात्र यानंतर विंडीज गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. त्याने होल्डरच्या एका षटकात एक चौकार आणि एक षटकार, तर पोलार्ड टाकत असलेल्या पुढच्याच षटकात तीन षटकार लगावले. त्याने टी-२० क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक केवळ २७ चेंडूत पूर्ण केले. मात्र, लेगस्पिनर हेडन वॉल्शच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो ५४ धावांवर बाद झाला.

मागील सामन्यात नाबाद ९४ धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या कर्णधार कोहलीला केरसिक विल्यम्सने लेंडल सिमन्सकरवी झेलबाद केले. पहिल्या सामन्यात कोहली आणि विल्यम्समध्ये वेगळेच द्वंद्व पाहायला मिळाले होते. कोहलीने त्या सामन्यात विल्यम्सविरुद्ध चांगलीच फटकेबाजी केली होती, पण या सामन्यात विल्यम्सने आपला खेळ सुधारला. पुढे दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना रिषभ पंतने मात्र २२ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ७ बाद १७० अशी मजल मारली.

हे वाचा – शिवम दुबेचे धडाकेबाज अर्धशतक; पोलार्डही घाबरला

१७१ धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या सिमन्स आणि खासकरून एविन लुईसने आक्रमक फलंदाजी केली. लुईसने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. त्याला वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने यष्टिचित केले. त्याने आणि सिमन्सने ७३ धावांची सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिमरॉन हेटमायरने रविंद्र जाडेजाच्या एकाच षटकातील दोन सलग चेंडूंवर षटकार लगावले. पुढच्याही चेंडूवर षटकार लगावण्याच्या नादात तो २३ धावांवर माघारी परतला. कर्णधार कोहलीने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. यानंतर मात्र भारताच्या गोलंदाजांची कामगिरी अधिकच खालावली. सिमन्स आणि निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत विंडीजला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला. सिमन्सने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६७ धावा, तर पूरन १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक – भारत : २० षटकांत ७ बाद १७० (दुबे ५४, पंत नाबाद ३३; वॉल्श २/२८, विल्यम्स २/३०) वि. वेस्ट इंडिज : १८.३ षटकांत २ बाद १७३ (सिमन्स नाबाद ६७, लुईस ४०, पूरन नाबाद ३८; जाडेजा १/२२)

First Published on: December 8, 2019 10:57 PM
Exit mobile version