टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल! पुरुष, महिला संघांनी एकत्र केला प्रवास

टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल! पुरुष, महिला संघांनी एकत्र केला प्रवास

टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल, रोहितने शेअर केला फोटो

विराट कोहलीचा भारतीय पुरुष संघ गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारतीय महिला संघही इंग्लंडमध्ये मालिका खेळणार असून त्यांनी पुरुष संघासोबत इंग्लंडचा प्रवास केला. भारताचे अनुभवी फलंदाज लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंडमध्ये दाखल झाल्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे क्रिकेटपटू मागील १४ दिवस मुंबईत क्वारंटाईन होते. त्यानंतर गुरुवारी ते चार्टर्ड विमानाने इंग्लंडमध्ये दाखल झाले. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते.

साऊथहॅम्पटन येथे क्वारंटाईन 

इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर भारताच्या दोन्ही संघांना साऊथहॅम्पटन येथे नेण्यात आले. तिथे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपला आणि खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर भारताचा पुरुष संघ १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारताने या इंग्लंड दौऱ्यासाठी २० खेळाडूंची संघात निवड केली आहे.

महिला संघ २०१४ नंतर पहिल्यांदाच कसोटी खेळणार

तसेच भारताचा महिला संघ इंग्लंडमध्ये तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी सामन्यापासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून हा सामना १६ जूनपासून ब्रिस्टल येथे खेळला जाईल. मिताली राजचा महिला संघ २०१४ नंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळणार आहे. १५ जुलैला महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता होईल.

First Published on: June 3, 2021 6:01 PM
Exit mobile version