भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ४-२ ने विजय

भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ४-२ ने विजय

भारतीय हॉकी संघ

भारतीय हॉकी संघाने आपले अप्रतिम प्रदर्शन सुरूच ठेवत न्यूझीलंड हॉकी संघाला ४-२ ने पराभूत केले आहे. बंगळुरु येथील स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या मैदानावर न्यूझीलंड आणि भारत यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत आपले विजयी खाते खोलले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंह याने २ तर मनदीप सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक एक गोल केले आहेत. तर न्यूझीलंडकडून स्टिफन जेनीसनेच दोन्ही गोल केले.


सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ दाखवत पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला. रुपिंदरपालने केलेल्या या गोलमुळे भारताला दुसर्‍या मिनिटालाच सामन्यात आघाडी घेता आली. १५ व्या मिनिटाला मनप्रीत सिंगच्या पासवर मनदीपने गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर न्यूझीलंडने चांगले प्रत्युत्तर केले. २६ व्या मिनिटाला स्टिफन जेनीसने गोल करत भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. मात्र मध्यांतरानंतर एस. व्ही. सुनीलने निर्माण केलेल्या संधीवर रुपिंदरपालने पुन्हा एकदा भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून दिला. या गोलमुळे भारताने सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली. यानंतर भारताने आपले आकारमान सुरूच ठेवले. याचा फायदा घेत हरमनप्रीत सिंहने ३८ व्या मिनिटाला भारताची आघाडी ४-१ ने वाढवली. अखेरच्या सत्रात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. स्टिफन जेनिसने ५५ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत आपल्या संघाचा दुसरा गोल केला. मात्र, यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि भारताचा स्कोर आधीच ४ असल्याने भारताने हा सामना ४-२ असा जिंकला.

रुपिंदरपाल सिंह

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत १-० ची आघाडी घेतली असून यानंतरचा सामना २१ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार असून हा सामना भारताने जिंकल्यास भारत ही मालिका देखील जिंकू शकतो.

First Published on: July 20, 2018 3:07 PM
Exit mobile version