भारताच्या तेज चौकडीला रोखणे अवघड

भारताच्या तेज चौकडीला रोखणे अवघड

भारताची सध्याची वेगवान गोलंदाजांची फळी जगातील सर्वोत्तम मानली जाते. जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या तेज चौकडीने मागील दीड-दोन वर्षांत घरच्या मैदानावर आणि परदेशातही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळेच भारताने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात धूळ चारली. या चौकडीविरुद्ध खेळणे पुढील दोन वर्षे तरी कोणत्याही फलंदाजासाठी मोठे आव्हान असणार आहे, असे मत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी व्यक्त केले.

आमच्या वेगवान गोलंदाजांनी फारच उत्कृष्ट कामगिरी केली असून आणखी किमान दोन वर्षे त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. त्यांच्याविरुद्ध खेळणे कोणत्याही फलंदाजासाठी आव्हान असणार आहे. ते जर फिट राहिले, तर किमान दोन वर्षे आम्ही याच गोलंदाजांसह खेळू, असे अरुण म्हणाले. तसेच त्यांनी पुढे सांगितले, आपल्याकडे आता बरेच युवा वेगवान गोलंदाज पुढे येत आहेत. मात्र, त्यांच्यात आणखी सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. आपण वेगवान गोलंदाजांची मजबूत राखीव फळी तयार करणेही गरजेचे आहे. आपल्याकडे बरेच चांगले गोलंदाज असतील, तर आपण ठराविक काळाने सर्वांना विश्रांती देऊ शकतो. त्यामुळे त्यांची कारकीर्द अधिक प्रदीर्घ होईल.

First Published on: May 27, 2020 4:35 AM
Exit mobile version