भारताचा मालिका विजय

भारताचा मालिका विजय

मुंबईकर श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे, तसेच दीपक चहरच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर भारताने तिसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशला ३० धावांनी पराभूत केले. हा सामना जिंकल्यामुळे भारताने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात श्रेयसने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. आपला अकरावा टी-२० सामना खेळणार्‍या श्रेयसचे हे पहिले टी-२० अर्धशतक होते. गोलंदाजीत चहरने हॅटट्रिकसह ६, तर दुबेने ३ गडी बाद केले.
नागपूर येथे झालेल्या तिसर्‍या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहमदुल्लाहने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

भारताचा कर्णधार रोहित शर्माचा अवघ्या २ धावांवर शफीउल इस्लामने त्रिफळा उडवला. त्याचा सलामीचा साथीदार शिखर धवनने ४ चौकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. मात्र, तो शफीउलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यामुळे भारताची २ बाद ३५ अशी अवस्था होती. यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस आणि राहुल यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी तिसर्‍या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. राहुलने ३३ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, ५२ धावांवर त्याला अल-अमीन हुसेनने माघारी पाठवले.

श्रेयसने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ऑफस्पिनर अफीफ हुसेनच्या एकाच षटकात सलग तीन षटकार लगावले आणि २७ चेंडूत आपले टी-२० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. रिषभ पंतला मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याला अवघ्या ६ धावांवर सरकारने बाद केले. याच षटकात त्याने श्रेयसला ६२ धावांवर माघारी पाठवले. कृणाल पांड्याच्या जागी या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या मनीष पांडेने १३ चेंडूत नाबाद २२, तर दुबेने नाबाद ९ धावा केल्या. त्यामुळे भारताने २० षटकांत ५ बाद १७४ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना बांगलादेशची तिसर्‍याच षटकात २ बाद १२ अशी अवस्था होती. वेगवान गोलंदाज दीपक चहरने लिटन दास (९) आणि सौम्या सरकार (०) यांना माघारी पाठवले. परंतु, नवखा मोहम्मद नईम आणि मोहम्मद मिथुन यांनी तिसर्‍या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करत बांगलादेशच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. डावखुर्‍या नईमने उत्कृष्ट फलंदाजी करत ३४ चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, चहरने पुन्हा आपली जादू चालवत मिथुनला २७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तो बाद झाल्यावरही नईमने आपली फटकेबाजी सुरु ठेवली.

पहिल्या सामन्यात मॅचविनींग खेळी करणार्‍या मुशफिकूर रहीमचा दुबेने पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवला. दुबेनेच मग नईमला अप्रतिम यॉर्कर टाकत माघारी पाठवले. नईमने ४८ चेंडूत ८१ धावा केल्या, जी भारताविरुद्ध कोणत्याही बांगलादेशी फलंदाजाने केलेली सर्वोत्तम खेळी होती. पुढच्याच चेंडूवर अफीफ हुसेन खाते न उघडता बाद झाला. यानंतरच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे बांगलादेशचा डाव २० व्या षटकात १४४ धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक – भारत : २० षटकांत ५ बाद १७४ (श्रेयस ६२, राहुल ५२; सरकार २/२९, शफीउल २/३२) वि. बांगलादेश : १९.२ षटकांत सर्वबाद १४४ (नईम ८१, मिथुन २७; चहर ६/७, दुबे ३/३०).

First Published on: November 11, 2019 5:53 AM
Exit mobile version