आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंह गेहलोत यांचे निधन

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंह गेहलोत यांचे निधन

जनार्दनसिंह गेहलोत यांचे निधन

आंतरराष्ट्रीय कबड्डी आणि आशियाई कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंह गेहलोत यांचे बुधवारी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. मृदुला भदोडिया (गेहलोत), मुलगा तेजस्वी आणि सून असा परिवार आहे. गेहलोत यांचा पिंड तसा राजकीय. राजस्थान युवा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, तर अखिल भारतीय युवा काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. त्यांनी काही वर्षे राजस्थान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले. गिरीश भार्गव यांच्यामुळे ते कबड्डी क्षेत्रात आले. काही कालावधीतच ते राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशनचे सर्वेसर्वा झाले. ते राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते.

२८ वर्षे भारतीय कबड्डीच्या अध्यक्षपदी

शरद पवार भारतीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष असताना गेहलोत ८ वर्षे उपाध्यक्ष होते. १९८४-८५ साली मडगाव येथील राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान झालेल्या वार्षिक सभेत शरद पवार यांनी क्रीडा मार्गदर्शक तत्वामुळे ८ वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे अध्यक्षपद गेहलोत यांच्याकडे आले. त्यांनी सलग २८ वर्षे हे पद आपल्याकडे राखले. गेहलोत यांना २०१२ साली भारतीय हौशी महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले. मात्र, बहुमताच्या जोरावर त्यांनी आपल्या पत्नीला अध्यक्ष केले.

शरद पवारांनी वाहिली आदरांजली 

आज माझे राजकारण व कबड्डीतील सहकारी जनार्दनसिंह गेहलोत यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दुःख झाले. राजकारणात आम्ही युवा काँग्रेसपासून एकत्र काम केले. तर कबड्डीत मी ८ वर्षे भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा अध्यक्ष असताना ते माझ्यासोबत उपाध्यक्ष होते. मी अध्यक्षपदावरून पायउतार होताना त्यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपविली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. प्रो- कबड्डीला देखील त्यांनी चालना दिली. त्यांच्या जाण्याने कबड्डी वर्तुळात एक पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणे कठीण आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेहलोत यांना आदरांजली वाहिली.

First Published on: April 28, 2021 7:41 PM
Exit mobile version