IPL 2021 : मुंबईविरुद्ध विजय मिळवण्यात अखेर दिल्लीला यश; अमित मिश्रा ठरला मॅचविनर

IPL 2021 : मुंबईविरुद्ध विजय मिळवण्यात अखेर दिल्लीला यश; अमित मिश्रा ठरला मॅचविनर

अमित मिश्राने २४ धावांत ४ विकेट घेतल्या

लेगस्पिनर अमित मिश्राच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर ६ विकेट राखून विजय मिळवला. हा दिल्लीचा मुंबईविरुद्ध मागील सहा सामन्यांत पहिला विजय ठरला. तसेच यंदाच्या मोसमातील दिल्लीचा हा तिसरा विजय होता. मिश्राने २४ धावांत ४ विकेट घेतल्याने दिल्लीने मुंबईला २० षटकांत अवघ्या १३७ धावांवर रोखले होते. याचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ (७) लवकर बाद झाला. मात्र, शिखर धवन (४५) आणि स्टिव्ह स्मिथ (३३) यांनी संयमाने फलंदाजी करत दिल्लीला सावरले. तर ललित यादव (नाबाद २२) आणि शिमरॉन हेटमायर (नाबाद १४) यांनी चांगली फलंदाजी करत दिल्लीला पाच चेंडू शिल्लक राखत विजय मिळवून दिला.

मिश्राच्या चार विकेट

त्याआधी या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक केवळ २ धावा करून बाद झाला. मात्र, रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी ५९ धावांची भागीदारी रचत मुंबईचा डाव सावरला. आवेश खानने सूर्यकुमारला (२४) बाद करत ही जोडी फोडली. तर अमित मिश्राने रोहित (४४), हार्दिक पांड्या (०), किरॉन पोलार्ड (२) आणि ईशान किशन (२६) या चौघांना बाद करत मुंबईला अडचणीत टाकले. अखेर जयंत यादवने काही चांगले फटके मारत २३ धावांची खेळी केली. परंतु, मुंबईला २० षटकांत ९ बाद १३७ धावाच करता आल्या.

First Published on: April 20, 2021 11:36 PM
Exit mobile version