IPL 2021 MI vs RCB : हर्षल पटेलचा भेदक मारा; मुंबई ९ बाद १५९  

IPL 2021 MI vs RCB : हर्षल पटेलचा भेदक मारा; मुंबई ९ बाद १५९  

हर्षल पटेल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १४ व्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली. सलामीच्या लढतीत हर्षल पटेलने केलेल्या भेदक माऱ्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १५९ धावांवर रोखले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मुंबईचा निम्मा संघ गारद केला. त्याने ४ षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये एका सामन्यात ५ विकेट घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरली. तसेच त्याने अखेरच्या षटकात तीन विकेट घेताना केवळ एक धाव दिली. त्याला कायेल जेमिसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.

लिनचे अर्धशतक हुकले  

चेन्नई येथे होत असलेल्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिस लिन यांनी मुंबईच्या डावाची सावध सुरुवात केली. रोहित १९ धावांवर धावचीत झाला. लिनने मात्र खेळपट्टीवर वेळ घालवल्यावर फटकेबाजी केली. मात्र, त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. त्याला ३१ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवची साथ लाभली. यानंतर मात्र ईशान किशन (२८) आणि हार्दिक पांड्या (१३) वगळता मुंबईच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे मुंबईने २० षटकांत ९ बाद १५९ धावा केल्या.

First Published on: April 9, 2021 9:39 PM
Exit mobile version