IPL 2021 : विजयाच्या शोधात असलेल्या राजस्थान-कोलकातामध्ये आज टक्कर! 

IPL 2021 : विजयाच्या शोधात असलेल्या राजस्थान-कोलकातामध्ये आज टक्कर! 

संजू सॅमसन आणि इयॉन मॉर्गन

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत गुणतक्त्यात तळाला असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आज सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत चार-चार सामने खेळले असून केवळ एक-एक सामना जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या शोधात आहेत. आजचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारताना दिसू शकतील. कोलकाताला मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले होते. त्या सामन्यात २०२ धावा करूनही कोलकाताला पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने हा सामना १८ धावांनी जिंकला होता. त्यामुळे कोलकाताच्या गोलंदाजीत सुधारणा गरजेची आहे.

संघात बदल होणार?

चेन्नईविरुद्ध कोलकाताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. आंद्रे रसेल (५४), पॅट कमिन्स (नाबाद ६६) आणि दिनेश कार्तिक (४०) यांनी कोलकाताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्या संघात काही बदल होऊ शकतील.

सॅमसनच्या कामगिरीवर नजर 

दुसरीकडे राजस्थानला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मागील सामन्यात १० विकेट राखून पराभूत केले होते. त्यामुळे त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत सुधारणा करणे गरजेचे आहे. खासकरून त्यांचा कर्णधार संजू सॅमसन कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याने पहिल्या सामन्यात शतक केले, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे तो आज कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.


हेही वाचा – म्हणून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही; गावस्कर संजू सॅमसनवर भडकले


 

First Published on: April 24, 2021 4:51 PM
Exit mobile version