IPL 2023 : यावर्षी आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे; सुनील गावसकरांनी केले भाकित

IPL 2023 : यावर्षी आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे; सुनील गावसकरांनी केले भाकित

मुंबई : येत्या 31 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. यावेळी आयपीएलचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. जसजसे आयपीएलचे सामने जवळ येत आहे, तसतसे माजी दिग्गजांनी पुन्हा एकदा विजेत्या संघाविषयी भाकीत करण्यास सुरुवात केली आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी यावर्षीच्या आयपीएलच्या विजेत्या संघाबाबत मोठे भाकीत केले आहे.

माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना यावेळी आयपीएलचे जेतेपद कोणता संघ पटकावणार याविषयी सांगितले आहे. गेल्या हंगामात खराब कामगिरी करूनही यावेळी मुंबई इंडियन्स विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे भाकीत गावस्कर यांनी केले आहे.

आपले म्हणणे मांडताना गावसकर यांनी सांगितले की, गेल्या हंगामात मुंबईने केलेली कामगिरी त्यांना विसरावी लागेल. जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये नाही पण मुंबई संघात असे खेळाडू आहेत जे त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकतात. त्यामुळे रोहित शर्मासाठी योग्य संघ निवडणे महत्त्वाचे आहे जेणेकरून या मोसमात त्याचा संघ पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये दिसेल. त्यामुळे मी या संघाला टॉप 3 मध्ये पाहतो, असेही गावसकर म्हणाले.

मागच्या आयपीएलबद्दल सांगायचे तर, आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्सने विजेतेपद जिंकले होते आणि मुंबईचा संघ शेवटच्या स्थानावर होता. त्यामुळे 5 वेळचा आयपीएल विजेता संघ यावेळी कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या हंगामात मुंबईचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत आपला पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळणार आहे.

बुमराहच्या जागी कोणाला संधी
सुनील गावसकर म्हणाले की, बुमराह हा मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र तो बराच काळ मैदानाबाहेर असून त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यताही कमीच आहे. बुमराह नसला तरी मुंबई इंडियन्स संघात असे खेळाडू आहेत जे त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकतात. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन, तसेच श्रीलंकेचा दासून शनाका आणि न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल या नावांचा समावेश आहे. हे गोलंदाज मुंबई इंडियन्ससाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतात, असे सुनील गावसकर यांना वाटते.

First Published on: March 16, 2023 6:01 PM
Exit mobile version