IND vs ENG : ईशांतचे कसोटी बळींचे त्रिशतक; ‘या’ भारतीयांच्या पंक्तीत स्थान

IND vs ENG : ईशांतचे कसोटी बळींचे त्रिशतक; ‘या’ भारतीयांच्या पंक्तीत स्थान

ईशांत शर्मा

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ईशांतने या कसोटीच्या दुसऱ्या डावात डॅनियल लॉरेन्सला पायचीत पकडले. त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे त्रिशतक पूर्ण केले. कसोटीत ३०० विकेट घेणारा ईशांत हा भारताचा एकूण सहावा आणि तिसरा वेगवान गोलंदाज ठरला. भारताकडून याआधी अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), रविचंद्रन अश्विन (३८७) आणि झहीर खान (३११) यांनी कसोटीत ३०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. ईशांतने आपल्या ९८ व्या कसोटीत या विक्रमाला गवसणी घातली. ‘ईशांत शर्माचे अभिनंदन. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणारा ईशांत हा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने लॉरेन्सला पायचीत पकडले,’ असे बीसीसीआयने ट्विट केले.

११ वेळा डावात पाच विकेट

२००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ईशांतने आतापर्यंत ९८ कसोटी सामन्यांत ३०० विकेट घेतल्या आहेत. त्याने ११ वेळा एका डावात पाच विकेट घेण्याची, तर एकदा सामन्यात १० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ७४ धावांत ७ विकेट घेतल्या होत्या. ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दोन डावांत मिळून ३ विकेट घेतल्या.


हेही वाचा – IND vs ENG : भारताला ४२० धावांचे लक्ष्य


 

First Published on: February 8, 2021 4:49 PM
Exit mobile version