कोहलीही चुका करतो पाहून बरे वाटले -बोल्ट

कोहलीही चुका करतो पाहून बरे वाटले -बोल्ट

भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी न्यूझीलंडचा दौरा विसरण्याजोगा ठरला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून कोहलीला या दौर्‍यातील ११ डावांत मिळून केवळ १ अर्धशतक करता आले. सध्या सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात त्याला १४ धावाच करता आल्या. कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत याचा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला आनंद आहे.

कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि याबाबत काहीच शंका नाही. तो भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला जास्तीतजास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही दबाव टाकल्याने कोहलीसारखा फलंदाजही चुका करतो हे पाहून बरे वाटले. त्याला पॅव्हेलियनमध्ये परतताना पाहून आनंद होतो, असे बोल्ट दुसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यावर म्हणाला.

भारताच्या फलंदाजांनी दोन्ही कसोटी सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली. याविषयी बोल्टने सांगितले, त्यांना भारतात फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळायची सवय आहे. तिथे चेंडू फारसा वेगाने येत नाही. इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे आणि या परिस्थितीशी जुळवून घेण्यात त्यांना कदाचित वेळ लागला.

फलंदाजांना दोष द्यायचा नाही – बुमराह

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांवर गुंडाळत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, भारताच्या फलंदाजांनी दुसर्‍या डावातही निराशाजनक कामगिरी सुरु ठेवली. त्यामुळे दुसर्‍या दिवसअखेर भारताची ६ बाद ९० अशी अवस्था होती. मात्र, बुमराहला फलंदाजांना दोष द्यायचा नाही. आम्ही एकमेकांना दोष देत नाही. आम्ही संघ म्हणून एकत्र खेळतो. कधी जर गोलंदाजांना विकेट मिळवण्यात अपयश आले, तर फलंदाज आमच्यावर टीका करतील का?, असे बुमराह म्हणाला.

First Published on: March 2, 2020 5:32 AM
Exit mobile version