यामागूची पडली ‘पुन्हा’ सिंधूवर भारी

यामागूची पडली ‘पुन्हा’ सिंधूवर भारी

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा चौथा दिवस भारतासाठी संमिश्र निकालांचा राहिला. भारताची स्टार खेळाडू पी.व्ही.सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला जपानच्या अकाने यामागूचीने १८-२१, १५-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. हा सिंधूचा यामागूचीविरुद्धचा सलग दुसरा पराभव होता. मागील आठवड्यात झालेल्या इंडोनेशिया ओपनच्या अंतिम सामन्यात यामागूचीने सिंधूवर मात केली होती. परंतु, त्या पराभवातून शिकून सिंधूला जपान ओपनमध्ये यामागूचीला पराभूत करण्यात अपयश आले. पुरुष एकेरीत साई प्रणितने मात्र आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यामागूचीने सिंधूला १८-२१, १५-२१ असे पराभूत केले. ५० मिनिटे चाललेल्या या सामन्याची सुरुवात सिंधूसाठी चांगली झाली. पहिल्या गेममध्ये ४-४ अशी बरोबरी असताना सिंधूने आक्रमक खेळ करत मध्यंतराला ११-७ अशी आघाडी मिळवली. मात्र, मध्यंतरानंतर यामागूचीने आपल्या खेळात सुधारणा करत १४-१४ अशी बरोबरी केली. यामागूचीने आपला दमदार खेळ सुरु ठेवत पुढील ६ पैकी ५ गुण मिळवत १९-१५ अशी आघाडी घेतली आणि अखेर तिनेच हा गेम २१-१८ असा जिंकला.

या सामन्यातील, तसेच स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी सिंधूला दुसरा गेम जिंकणे अनिवार्य होते. तिने या गेमच्या सुरुवातीला यामागूचीला चांगली झुंज दिली. त्यामुळे या गेममध्ये ६-६ अशी बरोबरी होती. मात्र, यानंतर खेळ खालावल्याने मध्यंतराला सिंधू ७-११ अशी पिछाडीवर पडली. तिने पुढेही बर्‍याच चुका केल्या. त्यामुळे सिंधूने दुसरा गेम १५-२१ असा गमावला आणि तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीत भारताच्या साई प्रणितने इंडोनेशियाच्या टॉमी सुगिर्तोचा २१-१२, २१-१५ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने या सामन्याचा पहिला गेम अगदी सहजरित्या जिंकला, पण दुसर्‍या गेममध्ये सुगिर्तोने त्याला चांगली झुंज दिली. त्यामुळे दुसर्‍या गेममध्ये प्रणितकडे १२-९ अशी अवघी ३ गुणांची आघाडी होती. यानंतरही सुगिर्तोने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रणितने आपला खेळ उंचावत हा गेम आणि सामना जिंकला. आता त्याचा उपांत्य फेरीत अव्वल सीडेड जपानच्या केंटो मोमोटाशी सामना होईल.

सात्विकराईराज-चिरागचे आव्हान संपुष्टात

जपान ओपनच्या पुरुष दुहेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विकराईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पराभव झाला. जपानची जोडी ताकेशी कामुरा आणि किगो सोनोडा यांनी भारताच्या जोडीला चुरशीच्या सामन्यात २१-१९, २१-१८ असे पराभूत केले. या सामन्यातील दोन्ही गेम जिंकण्याची सात्विकराईराज-चिराग यांना संधी होती. मात्र, त्यांनी काही चुका केल्या आणि याचा जपानच्या जोडीने फायदा घेत हा सामना जिंकला.

First Published on: July 27, 2019 4:58 AM
Exit mobile version