भारताने चांगलाच धडा शिकवला

भारताने चांगलाच धडा शिकवला

केन विल्यम्सनची कबुली

भारताने न्यूझीलंडचा पाचव्या एकदिवसीय सामन्यात ३५ धावांनी पराभव केला. या सामन्यात ४ बाद १८ अशी अवस्था असतानाही भारताला विजय मिळवण्यात यश आले. या संपूर्ण मालिकेत मोक्याच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. त्यामुळेच भारताने ही मालिका ४-१ अशा मोठ्या फरकाने जिंकली. आम्हाला भारताने प्रतिस्पर्धी संघाला दबावात कसे टाकायचे याचा चांगलाच धडा शिकवला, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर म्हणाला.

भारताने आमच्याच घरात येऊन आम्हाला धडा शिकवला आहे. त्यांनी या संपूर्ण मालिकेत मोक्याच्या क्षणी चांगला खेळ केला. आमच्यावर नेहमी दबाव बनवून ठेवला, जे आम्हाला करायला जमले नाही. पाचव्या सामन्यातही तेच झाले. त्यांची अवस्था बिकट असताना आम्ही त्यांना पुनरागमनाची संधी दिली.

अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी खूपच चांगली फलंदाजी केली. रायडूची खेळी तर ’मॅचविनींग’ होती. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा भारताने जास्त धावा केल्या. मात्र तरीही आम्हाला जिंकण्याची संधी होती. पण आम्ही विकेट गमावत गेलो आणि आमचा पराभव झाला, असे विल्यम्सन म्हणाला.

First Published on: February 4, 2019 4:26 AM
Exit mobile version