कांगारूंनी जिंकली वन-डे मालिका

कांगारूंनी जिंकली वन-डे मालिका

निर्णायक सामन्यात ३५ धावांनी विजय

उस्मान ख्वाजाचे शतक आणि अ‍ॅडम झॅम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा ऑस्ट्रेलियाचा भारतातील २००९ नंतरचा पहिला मालिका विजय होता. तर भारताने घरच्या मैदानावर २०१५ नंतर पहिली एकदिवसीय मालिका गमावली.

या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि अ‍ॅरॉन फिंच यांनी डावाची चांगली सुरुवात केली. खासकरून त्यांनी या सामन्यात पुनरागमन करणार्‍या मोहम्मद शमीवर हल्ला चढवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ५ षटकांत ३० धावा झाल्या होत्या. यानंतर मात्र भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने धावांना लगाम लगावला. त्यामुळे पुढील ५ षटकांत ऑस्ट्रेलियाला २२ धावाच करता आल्या. या सामन्याच्या १५ व्या षटकात डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजाने फिंचला २७ धावांवर त्रिफळाचित करत ही जोडी फोडली. त्याने आणि ख्वाजाने पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. यानंतर मागील सामन्यातील शतकवीर पीटर हँड्सकॉम्बने ख्वाजाला चांगली साथ दिली. ख्वाजाने ४८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी भारताचे फिरकीपटू जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासमोर खूपच चांगली फलंदाजी केली.

ख्वाजाने या डावातील ३२ व्या षटकात १ धाव काढत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे या मालिकेतील आणि कारकिर्दीतील दुसरे शतक होते. मात्र, १०० धावांवरच भुवनेश्वरने त्याला बाद केले. त्याने या धावा १०६ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केल्या. तसेच त्याने आणि हँड्सकॉम्बने दुसर्‍या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेलही फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. पुढे हँड्सकॉम्बने ५५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण ५२ धावांवर त्याला शमीने माघारी पाठवले. अ‍ॅष्टन टर्नर (२०) आणि अ‍ॅलेक्स कॅरी (३) हे दोघे झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची ४ षटके बाकी असताना ७ बाद २२९ अशी धावसंख्या झाली होती. यानंतर जाय रिचर्डसन (२१ चेंडूंत २९) आणि पॅट कमिन्स (८ चेंडूंत १५) यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने आपल्या ५० षटकांत ९ विकेट गमावत २७२ धावा केल्या.

२७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मागील सामन्यात शतक करणारा भारताचा सलामीवीर या सामन्यात अवघ्या १२ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ५३ धावांची भागीदारी करत भारताच डाव सावरला. मात्र, कोहलीला मार्कस स्टोइनिसने अ‍ॅलेक्स कॅरीकरवी २० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. अंबाती रायडूच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. मात्र, याचा त्याला फायदा घेता आला नाही. त्याला १६ धावांवर नेथन लायनने बाद केले. रोहितने एका बाजूने चांगली फलंदाजी करत ७३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

यानंतर मात्र विजय शंकर (१६), रोहित (५६) आणि रविंद्र जाडेजा (०) यांना लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाने झटपट माघारी पाठवले. त्यामुळे भारताची ६ बाद १३२ अशी अवस्था झाली होती. पण, सातवी जोडी केदार जादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी आक्रमक फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. या दोघांनी १७ षटकांत ९१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या, मात्र आधी भुवनेश्वर (५४ चेंडूंत ४६) आणि नंतर केदार (५७ चेंडूंत ४४) लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले. पुढे तळाच्या फलंदाजांना फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि भारताचा डाव अखेरच्या चेंडूवर २३७ धावांवर संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ९ बाद २७२ (उस्मान ख्वाजा १००, पीटर हँड्सकॉम्ब ५२, जय रिचर्डसन २९; भुवनेश्वर कुमार ३/४८, रविंद्र जाडेजा २/४५, मोहम्मद शमी २/५७) विजयी वि. भारत : ५० षटकांत सर्वबाद २३७ (रोहित शर्मा ५६, भुवनेश्वर कुमार ४६, केदार जाधव ४४; अ‍ॅडम झॅम्पा ३/४६, मार्कस स्टोइनिस २/३१).

– ख्वाजाचे विक्रमी शतक
उस्मान ख्वाजाने या सामन्यात १०० धावांची खेळी केली. हे त्याचे या मालिकेतील दुसरे शतक होते. भारताविरुद्ध एका एकदिवसीय सामन्यात दोन शतके करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याने या मालिकेत रांची येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात १०४ धावांची खेळी केली होती, तर तिसर्‍या सामन्यात त्याचे शतक ९ धावांनी चुकले होते. तसेच भारताविरुद्ध ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही ख्वाजाने आपल्या नावे केला आहे. त्याने या मालिकेत २ शतके आणि २ अर्धशतकांसह ३८३ धावा केल्या. याआधी हा विक्रम द.आफ्रिकेच्या एबी डी व्हिलियर्सच्या नावे होता. त्याने एका मालिकेत ३५८ धावा केल्या होत्या.

First Published on: March 14, 2019 4:17 AM
Exit mobile version