कोहली-धोनी टीम इंडियासाठी फायदेशीर

कोहली-धोनी टीम इंडियासाठी फायदेशीर

कपिल देव यांचे मत

यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांना ३० मेपासून सुरु होणारा क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. या दोन्ही संघांनी मागील २-३ वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे हे दोन संघ जागतिक क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर आहेत. आगामी विश्वचषकात १० संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघ सर्व संघांशी सामना खेळणार आहे. त्यामुळे या विश्वचषकात संघ संतुलित असणे महत्त्वाचे असून भारताला कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी असल्याचा फायदा होईल, असे मत १९८३ साली विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.

भारताच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडू यांचे चांगले मिश्रण आहे. तसेच भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत जास्त अनुभवी आहे. चार वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटू असणारा हा संघ खूप संतुलित आहे. विराट कोहली आणि धोनी संघात असल्याचा भारताला खूप फायदा होईल. कोहली आणि धोनीने भारतासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. इतर कोणीही या दोघांच्या कामगिरीच्या जवळपासही नाही. भारताचे चारही वेगवान गोलंदाज अप्रतिम आहेत. चेंडू स्विंग करण्यासाठी त्यांना इंग्लंडच्या वातावरणाचा फायदा होईल. शमी आणि बुमराह हे दोघे १४५ किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करू शकतात, असे कपिल देव म्हणाले.

भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणार असे कपिल देव यांना वाटते. याबाबत ते म्हणाले, भारत किमान उपांत्य फेरी गाठणार यात जराही शंका नाही. मात्र, त्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही. उपांत्य फेरीपुढे कोण जाणार हे खेळाडू आणि संघाचे प्रदर्शन तसेच नशिबावरही अवलंबून असते. माझ्या मात्र भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरी गाठणारच. हे तीन संघ इतर संघांच्या तुलनेत जास्त ताकदवान आहेत. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांपासूनही इतरांनी सावध राहिले पाहिजे.

मला तुलना आवडत नाही!

हार्दिक पांड्या आणि कपिल देव यांची वारंवार तुलना करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कपिल यांना फारशी आवडत नाही. ते म्हणाले, मला कोणत्याही खेळाडूची दुसर्‍या एखाद्या खेळाडूसोबत तुलना केलेली आवडत नाही. तसे केल्याने विनाकारणच सध्या खेळत असलेल्या खेळाडूवर दबाव येतो. विश्वचषकात हार्दिकवर जास्त दबाव टाकून चालणार नाही. तो खूप प्रतिभावान खेळाडू असून त्याला आपला नैसर्गिक खेळ करण्याची मुभा दिली पाहिजे.

First Published on: May 9, 2019 4:43 AM
Exit mobile version