IPL : स्पर्धा सुरु होण्याआधीच मुंबईला धक्का; मलिंगा यंदाच्या मोसमाला मुकणार 

IPL : स्पर्धा सुरु होण्याआधीच मुंबईला धक्का; मलिंगा यंदाच्या मोसमाला मुकणार 

लसिथ मलिंगा

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदा या स्पर्धेत खेळणार नाही. मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. मुंबईने आतापर्यंत विक्रमी चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली असून त्यांच्या यशात मलिंगाचा मोठा वाटा आहे. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन मुंबई संघात मलिंगाची जागा घेईल.

मलिंगाची उणीव भासेल

यंदा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल होणार आहे. मलिंगा वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर काही आठवड्यांत शस्त्रक्रिया होऊ शकेल. त्यामुळे मलिंगाने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मलिंगा हा मुंबईचा प्रमुख खेळाडू आहे. यंदाच्या मोसमात त्याची उणीव आम्हाला नक्कीच भासेल. परंतु, आम्ही त्याची परिस्थिती समजू शकतो. त्याला या परिस्थितीत श्रीलंकेमध्ये कुटुंबासोबत राहायचे आहे,’ असे मुंबईचा संघमालक आकाश अंबानी म्हणाला. मलिंगाने वर्षानुवर्षे मुंबईकडून उत्कृष्ट कामगिरी केली असून आतापर्यंत १२२ आयपीएल सामन्यांत १७० विकेट घेतल्या आहेत.

जेम्स पॅटिन्सन घेणार जागा 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन मुंबई संघात मलिंगाची जागी घेईल. ३० वर्षीय पॅटिन्सनने आतापर्यंत ३९ टी-२० सामने खेळले असून त्यात ४७ विकेट घेतल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाकडून ४ टी-२० सामन्यांत तीन विकेट त्याच्या नावे आहेत. पॅटिन्सन त्याच्या तेजतर्रार माऱ्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या वेगाचा युएईमध्ये मुंबई इंडियन्सला फायदा होईल अशी संघमालक आकाश अंबानीला आशा आहे.

First Published on: September 2, 2020 7:40 PM
Exit mobile version