Champions League : लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी विजयी 

Champions League : लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी विजयी 

दिओगो जोटा

दिओगो जोटा आणि मोहम्मद सलाह यांच्या गोलमुळे लिव्हरपूलने युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात मिडजीलँडचा २-० असा पराभव केला. हा लिव्हरपूलचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे लिव्हरपूलचा संघ ‘डी’ गटात अव्वल स्थानावर आहे. याच गटातील अटलांटा आणि आयेक्स यांच्यामधील सामना २-२ असा बरोबरीत संपला. अटलांटाकडून डूवान झपाटाने, तर आयेक्सकडून डुसान टॅडिच आणि लसीना ट्राओरे यांनी गोल केले.

फेरान टोरेसचा गोल

दुसरीकडे मँचेस्टर सिटीने फ्रेंच संघ मार्सेवर ३-० अशी मात केली. सिटीने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना १८ व्या मिनिटाला झाला. फेरान टोरेसने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीला १-० अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धात इकाय गुंडोगन आणि रहीम स्टर्लिंगने आणखी दोन गोलची भर घातली. त्यामुळे मँचेस्टर सिटीने हा सामना ३-० असा जिंकला. मँचेस्टर सिटीला यंदा आपले दोन्ही सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे गट ‘सी’मध्ये मँचेस्टर सिटीचा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. याच गटात पोर्टो संघाने फॅबिओ व्हिएरा आणि सर्जिओ ऑलिव्हेराच्या गोलच्या जोरावर ऑलिम्पियाकोसला २-० असे पराभूत केले.

बायर्नची मॉस्कोवर मात

गतविजेत्या बायर्न म्युनिकने युएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात लोकोमोटिव्ह मॉस्कोवर २-१ अशी मात केली. बायर्नकडून पूर्वार्धात लियॉन गोरिट्झका, तर उत्तरार्धात जॉश किमीचने गोल केले. या विजयामुळे बायर्नचा संघ गट ‘ए’मध्ये ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच रियाल माद्रिद आणि बुरुसिया मोंचेनग्लाडबाग यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत संपला.

First Published on: October 28, 2020 8:15 PM
Exit mobile version