लबसचेंगची शतकांची हॅटट्रिक

लबसचेंगची शतकांची हॅटट्रिक

युवा फलंदाज मार्नस लबसचेंग

युवा फलंदाज मार्नस लबसचेंगच्या अप्रतिम शतकामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४८ अशी धावसंख्या उभारली. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लबसचेंगने २०२ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद ११० धावांची खेळी केली. हे त्याचे सलग तिसरे कसोटी शतक आहे. त्याने याआधीच्या मालिकेत पाकिस्तानविरुद्ध १८५ आणि १६२ धावा केल्या होत्या.

पर्थ येथे होत असलेल्या डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर डेविड वॉर्नरने आपला चांगला फॉर्म कायम राखत ४३ धावांची खेळी केली. त्यानंतर लबसचेंग आणि स्टिव्ह स्मिथ (४३) यांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत १३२ धावांची भर घातली. स्मिथला निल वॅग्नरने बाद केले.

लबसचेंगने मात्र उत्तम फलंदाजी सुरु ठेवत १६६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दिवसअखेर तो ११०, तर ट्रेव्हिस हेड २० धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून वॅग्नरने ५२ धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स मिळवल्या.

First Published on: December 13, 2019 5:20 AM
Exit mobile version