कोरोनाचे क्रिकेटच्या सामन्यांवर सावट; आणखी एक लीग रद्द!

कोरोनाचे क्रिकेटच्या सामन्यांवर सावट; आणखी एक लीग रद्द!

प्रातिनिधीक फोटो

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द होतच आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अमेरिकन क्रिकेट एंटरप्राइझने मायनर लीग क्रिकेटचा पहिला हंगाम पुढे ढकलला आहे. या महिन्यात ही स्पर्धा सुरू होणार होती मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. अहवालानुसार, एमएलसीचा पहिला हंगाम आता पुढच्या वर्षी खेळला जाणार आहे. यापूर्वी कोविड १९ मुळे 20-20 विश्वचषक सारखी मोठी स्पर्धादेखील रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, या स्पर्धेचे आयोजक यावर्षीही काही सामने आयोजित करू इच्छित आहेत. ५ सप्टेंबरनंतर या स्पर्धेतील काही संघांमध्ये काही सामने रंगताना पाहायला मिळणार आहे. सामने कसे आयोजित केले जातील आणि त्यांचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यात सामन्यांच्या स्वरूपाची सर्व माहिती समजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, अमेरिकन क्रिकेट एंटरप्राइझ ड्राफ्टमध्ये असलेल्या खेळाडूंसोबत पुढे जाऊन संघ बनवू शकतो. यासाठी सुमारे २ हजार खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. एसीएफने यापूर्वी २४ संघांच्या स्थापनेची घोषणाही केली होती. असा विश्वास आहे की, आता ज्या खेळाडूची निवड केली जाईल त्यांना पुढील सीजन संघात समाविष्ट करण्यात येणार आहे. असे झाल्यास, खेळाडूंना त्यांच्या संघासह तयारीसाठी चांगली संधीही मिळण्याती शक्यता आहे.

या अहवालात असा दावा केला आहे की, संघाचे मालक पुढील आठवड्यात त्यांच्या निर्णयाबद्दल माहिती देतील. तर आतापर्यंत, संपूर्ण अमेरिकेत सर्व २४ संघांसाठी अधिक अर्ज आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा परिणाम झालेली ही पहिली क्रिकेट स्पर्धा नाही. गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये होणारा 20-20 वर्ल्ड कप आयसीसीने रद्द केला होता. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड मालिका वगळता सर्व कार्यक्रम गेल्या चार महिन्यांत रद्द करण्यात आले आहेत. तर क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय 20-20 लीग आयपीएल पुढील महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.


आयपीएल संघांना युएईमध्ये हवे केवळ तीन दिवसांचे क्वारंटाईन!

First Published on: August 6, 2020 12:24 PM
Exit mobile version