निवृत्ती जाहीर करण्याआधी धोनी कुठे आणि काय करत होता?

निवृत्ती जाहीर करण्याआधी धोनी कुठे आणि काय करत होता?

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला. धोनी सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल झालेल्या धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. १५ ऑगस्टला संध्याकाळी धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आज संध्याकाळी ७ वाजून २९ मिनीटांनंतर मी निवृत्त झालोय असं समजावं, असं म्हटलं आहे. मात्र, निवृत्तीची घोषणा करण्याआधी धोनी कुठे होता आणि काय करत होता? याबाबत सर्वजण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणार धोनी निवृत्तीची घोषणा करण्याआधी धोनी नेट्समध्ये सराव करत होता. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर एम. ए. चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या खेळाडूंसाठी ट्रेनिंग कँपचं आयोजन करण्यात आलं आहे. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान चेन्नईचे खेळाडू इथे सराव करणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्यापूर्वी धोनीने रैनासह मैदानावर घाम गाळत भरपूर सराव केला.

Two roads converged on a #yellove wood… #Thala #ChinnaThala #73Forever 🦁🦁

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

दरम्यान, धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनीचा साथीदार सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोघांच्या निवृत्तीने सर्वांना धक्का बसला. दरम्यान सध्या हे दोघेही आयपीएलसाठी तयारी करत आहेत. येत्या १९ सप्टेंबर पासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही धोनी पुढील काही वर्ष आयपीएल खेळणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी संवाद साधल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला आवडणार असल्याचं धोनीने CSK प्रशासनाला कळवलं आहे.

 

First Published on: August 16, 2020 2:57 PM
Exit mobile version