मुंबई फ्रंटफूटवर!

मुंबई फ्रंटफूटवर!

सर्फराज खान आणि आकर्षित गोमेलच्या शतकांपाठोपाठ गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईला पहिल्या डावात आघाडीची संधी निर्माण झाली आहे. या सामन्यात मुंबईचा पहिला डाव ४२७ धावांवर आटोपला. याचे उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर मध्य प्रदेशची ७ बाद २०० अशी अवस्था होती. ते अजून २२७ धावांनी पिछाडीवर होते.

दुसर्‍या दिवशी ४ बाद ३५२ वरुन पुढे खेळताना मुंबईचा पहिला डाव ४२७ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी १६९ धावांवर नाबाद असलेल्या सर्फराजला आपल्या धावसंख्येत केवळ ८ धावांची भर घालता आली. त्याला १७७ धावांवर रवी यादवने बाद केले. यानंतर कर्णधार आदित्य तरे (३२) वगळता इतर फलंदाजांना वीस धावांचाही टप्पा पार करता आला नाही.

याचे उत्तर देताना मध्य प्रदेशच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ५ बाद ७२ अशी अवस्था होती. परंतु, वेंकटेश अय्यर आणि कर्णधार शुभम शर्मा (१८) यांनी ६२ धावांची भागीदारी रचतमध्य प्रदेशचा डाव सावरला. शुभम बाद झाल्यावर मिहीर हिरवानीने अय्यरला काही काळ साथ दिली. या दोघांनी ६५ धावांची भागीदारी केल्यावर हिरवानीला २१ धावांवर रॉयस्टन डायसने माघारी पाठवले. अय्यरने मात्र एक बाजू लावून धरत १०५ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी केली. त्यामुळे मध्य प्रदेशची दिवसअखेर ७ बाद २०० अशी धावसंख्या होती.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : पहिला डाव सर्वबाद ४२७ (सर्फराज १७७, गोमेल १२२; गौरव यादव ४/१०१) वि. मध्य प्रदेश : पहिला डाव ७ बाद २०० (अय्यर नाबाद ८७; डायस २/३८, शेट्टी २/४३, मुलानी २/५२).

First Published on: February 14, 2020 5:10 AM
Exit mobile version