Mi vs CSK: पहिल्याच सामन्यात चेन्नईने उडवला मुंबईचा खुर्दा; ५ विकेट राखत दणदणीत विजय

Mi vs CSK: पहिल्याच सामन्यात चेन्नईने उडवला मुंबईचा खुर्दा; ५ विकेट राखत दणदणीत विजय

फॅफ डू प्लेसिस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरुवात मोठ्या धडाक्यात झाली. आज पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगला. अबू धाबी येथे होत असलेल्या या सामन्यात सीएसकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० ओव्हरमध्ये १६२ रन्स करत चेन्नईला १६३ रन्सचे आव्हान दिले होते. चेन्नईची सुरुवात थोडीशी अडखळतच झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये शेन व्हॉट्सन आणि मुरली विजय लवकर माघारी गेले. मात्र नंतर आलेल्या फॅप डूप्लेसी आणि अंबाती रायुडूने चेन्नईचा खेळ सावरला. अखेरच्या ओव्हरपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात चेन्नईने ५ विकेट राखत मुंबईवर मात केली.

तिसऱ्या विकेटसाठी अंबाती रायुडू आणि फॅफ डु प्लेसीने ११५ रन्सची पार्टनरशिप केली. रायुडूने ४८ बॉलमध्ये ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत ७१ रन्स काढल्या. तर फॅफ डु प्लेसीने मात्र शांत आणि संयमी खेळी करत एक बाजू लावून धरली. त्याने ४४ बॉलमध्ये ५८ धावा केल्या. विनिंग शॉटदेखील त्यानेच लगावला. तेव्हा धोनी नॉन स्ट्राईक एंडवरुन त्याची खेळी एन्जॉय करत होता. चेन्नई कडून रवींद्र जडेजाने १०, तर सॅम करनने १८ रन्सची जोड टीमला दिली. अगदी १९ व्या ओव्हरमध्ये सॅम करन आऊट झाल्यामुळे धोनीला मैदानात यावे लागले. मात्र फॅफ डु प्लेसीने त्याला फार संधी न देता स्वतःच सामना संपवून टाकला.

 

सलामीच्या लढतीत मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात झाली. कर्णधार रोहितने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. त्याने आणि क्विंटन डी कॉकने आक्रमक फलंदाजी करत ४.४ षटकांत ४६ धावांची सलामी दिली. यात रोहितचा १० चेंडूत १२ धावांचा वाटा होता. त्याला पियुष चावलाने बाद केले. तर पुढच्याच षटकात डी कॉकला सॅम करनने माघारी पाठवले. डी कॉकने २० चेंडूत ३३ धावांची खेळी केली. यानंतर सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव (१७) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केल्यावर सूर्यकुमारला दीपक चहरने बाद केले. त्यावेळी मुंबईची ३ बाद ९२ अशी धावसंख्या होती.

लुंगी इंगिडीचा भेदक मारा 

तिवारी (४२) आणि हार्दिक पांड्या (१४) यांना रविंद्र जाडेजाने माघारी पाठवले. या दोघांचेही फॅफ डू प्लेसिसने उत्कृष्ट झेल पकडले. लुंगी इंगिडीने यानंतर भेदक मारा करत कृणाल पांड्या (३), पोलार्ड (१८) आणि जेम्स पॅटिन्सन (११) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. त्यामुळे मुंबईला २० निर्धारित षटकांत ९ बाद १६२ धावाच करता आल्या. चेन्नईकडून इंगिडीने ३८ धावांत ३ विकेट घेतल्या.

First Published on: September 19, 2020 11:21 PM
Exit mobile version