होम ग्राऊंडवर मुंबईची सरशी

होम ग्राऊंडवर मुंबईची सरशी

पुण्यावर ३३-२३ अशी सहज बाजी

शनिवारी यू मुंबा आणि पुणेरी पलटण यांच्यातील रंगलेल्या सामन्यात यु मुंबाने पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे. यू मुंबा आणि पुणेरी पलटन या दोन महाराष्ट्रातील संघांमध्ये यजमान मुंबईने ३३-२३ अशी सहज बाजी मारली.यू मुंबाकडून अभिषेक सिंग, रोहित बलियान, सुरींदर सिंग, संदीप नरवाल आणि फैझल अत्राचली यांनी चढाई व पकडीत दमदार खेळ केला. पुण्याकडून सुरजीत सिंग, पवन कॅडियन, संकेत सावंत यांचा संघर्ष अपयशी ठरला.

दुसर्‍या सत्रात दोन लोण खाल्यानंतर पुण्याने अखेर पराभव मान्य केला. सुरिंदर सिंग आणि फझल अत्राचली यांच्या पकडींनी पहिले सत्र गाजवला. सुरुवातीच्या काही मिनिटांत २-५ अशा पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने नंतर मुसंडी मारली. दोन्ही संघांची बचावफळी भक्कम असल्याने दोन्ही संघांच्या चढाईपटूंना फार गुण घेता आले नाही. यू मुंबाने पकडीत ७ गुण घेतले,तर पुणेरी पलटनला ६ गुण घेता आले. चढाईतही यू मुंबा ४-३ असा वरचढ ठरला. त्यामुळे यू मुंबाने पहिल्या सत्रात ११-९ अशी आघाडी घेतली.

दुसर्‍या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला यू मुंबाने लोण चढवला आणि १५-१० अशी आघाडी घेतली. या धक्क्यानंतर पुण्याच्या खेळाडूंचा ढिसाळ खेळ पाहायला मिळाला. यजमान मुंबईने एकेक गुण घेत आघाडी वाढवत नेली. मुंबाच्या अभिषेक सिंगने पुण्याचा बचाव भेदला. तसेच अर्जुन देश्वालने एकाच चढाईत तीन गुण घेतले. त्यानंतर आणखी एक लोण चढवत अखेरच्या ८ मिनिटापर्यंत यू मुंबाने २७-१७ अशी आघाडी घेतली होती.

सुशांत सैलने अखेरच्या पाच मिनिटांत चढाईत गुण घेत पुण्याच्या आशा पल्लवित केल्या. पण, संदीप नरवालने त्याची सूपर टॅकल करून मुंबाची आघाडी ३०-२१ अशी आणखी भक्कम केली. त्यानंतर मुंबाने सामना सहज जिंकला.

First Published on: July 28, 2019 4:26 AM
Exit mobile version