अधिक सकारात्मक फलंदाजी गरजेची!

अधिक सकारात्मक फलंदाजी गरजेची!

अजिंक्य रहाणेचे मत

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्याच्या दोन्ही डावांत भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे भारताच्या फलंदाजांवर बरीच टीका झाली. अति बचावात्मक शैलीत फलंदाजी करणे आम्हाला महागात पडले. आम्ही न्यूझीलंडला त्यांना हवी तशी गोलंदाजी करु दिली, असे सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. कोहलीच्या मताशी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सहमत आहे. दुसर्‍या कसोटीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकायचा असल्यास आम्ही अधिक सकारात्मक फलंदाजी करण्याची गरज आहे, असे रहाणे म्हणाला.

आम्ही आक्रमकपणे फलंदाजी केली पाहिजे असे मी म्हणणार नाही. मात्र, आम्ही अधिक सकारात्मक फलंदाजी करणे गरजेचे आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत अधिक उसळी घेणारे चेंडू टाकताना क्रीजच्या कोनांचा चांगला वापर केला. फलंदाज म्हणून तुम्ही एखादा फटका मारण्याचा विचार करत असाल, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन तो फटका मारला पाहिजे. तुम्ही फार विचार करता कामा नये. आता वेलिंग्टनमध्ये काय झाले हे विसरून आम्ही दुसर्‍या कसोटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रहाणेने नमूद केले.

भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला पहिल्या कसोटीच्या दोन डावांत मिळून १२३ चेंडूत २२ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली. मात्र, त्याला पाठिंबा दर्शवताना रहाणे म्हणाला, पुजारा धावा करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, बोल्ट, साऊथी आणि न्यूझीलंडच्या इतर गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे त्याला वेगाने धावा करता आल्या नाहीत. मात्र, हे प्रत्येक फलंदाजाबाबत घडते. तुम्ही सकारात्मक पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते आणि ते पुजारा करत होता.

पृथ्वी सराव सत्राला मुकला!

डाव्या पायाला सूज आल्यामुळे भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला गुरुवारी झालेल्या सराव सत्राला मुकावे लागले. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणार्‍या दुसर्‍या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पृथ्वीला सूज कशामुळे आली हे शोधण्यासाठी त्याची रक्त तपासणी केली जाणार आहे. पृथ्वीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच तो कसोटी खेळणार की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पृथ्वीला दुसर्‍या कसोटीला मुकावे लागल्यास शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळू शकेल.

First Published on: February 28, 2020 5:26 AM
Exit mobile version