जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास किवीज उत्सुक

जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास किवीज उत्सुक

New Zealand Cricket Team

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या संघांपैकी एक म्हणजे न्यूझीलंड. अगदी पहिल्या विश्वचषकापासूनच किवींनी विश्वचषकावर आपली छाप पाडली आहे. त्यांना विश्वचषकाच्या ११ पैकी ९ पर्वांमध्ये बाद फेरी गाठण्यात यश आले आहे, तर त्यांनी ५ वेळा उपांत्य फेरीचा टप्पा गाठला आहे. मात्र, त्यांना अजून एकदाही विश्वचषक जिंकण्यात यश आलेले नाही. मागील (२०१५) विश्वचषक हा त्यांच्या घरातच झाला होता. ब्रेंडन मॅक्युलमच्या नेतृत्वात या संघाने सर्वात मनोरंजक क्रिकेट खेळले. मनोरंजक खेळ करताना त्यांनी निकालांकडे दुर्लक्ष केले नाही. या विश्वचषकात त्यांनी आठ पैकी आठ सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे विश्वविजेते होण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. त्यामुळे आगामी विश्वचषकात हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून न्यूझीलंड संघ मैदानात उतरेल यात शंका नाही.

मागील विश्वचषकापेक्षा या विश्वचषकात न्यूझीलंडचा वेगळा आणि कदाचित थोडा कमकुवत संघ पहायला मिळणार आहे. अनेक वर्षांपासून न्यूझीलंड संघाचे आधारस्तंभ असलेले ब्रेंडन मॅक्युलम आणि डॅनियल व्हिटोरी हे खेळाडू आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये होणार्‍या आगामी विश्वचषकात कर्णधार केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट या अनुभवी खेळाडूंना अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे.

न्यूझीलंड संघाला मागील १-२ वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही. २०१८च्या सुरुवातीपासून न्यूझीलंडने एकूण ६ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी ३ (पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश) त्यांनी जिंकल्या, २ (इंग्लंड, भारत) गमावल्या आणि १ मालिका बरोबरीत राहिली होती. या विश्वचषकात प्रत्येक संघ सर्व संघांशी सामना खेळणार असल्याने न्यूझीलंडला यश मिळवण्यासाठी आपला खेळ उंचवावा लागणार आहे. मात्र, या संघात बरेच प्रतिभावान खेळाडू असल्याने या विश्वचषकातही ते चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.

विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लेथम (यष्टीरक्षक), कॉलिन मुनरो, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, जिमी निशम, इश सोधी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट.

(खेळाडूवर लक्ष) –
केन विल्यमसन [फलंदाज]
एकदिवसीय सामने : १३९
धावा : ५५५४
सरासरी : ४५.९०
स्ट्राईक रेट : ८२.६१
सर्वोत्तम : नाबाद १४५

विश्वविजेते – एकदाही नाही

जमेची बाजू – सलामीवीर मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन आणि रॉस टेलर या तीन अनुभवी फलंदाजांनी मागील काही काळात चांगली कामगिरी केली आहे. तसेच हे तिघेही मागील विश्वचषकातही खेळले होते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना न्यूझीलंडच्या पहिल्या तीन विकेट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. तसेच टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट हे अनुभवी वेगवान गोलंदाज या संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील. बोल्ट सध्या जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. साऊथीला मागील २ वर्षांत विशेष कामगिरी करण्यात अपयश आलेले असले तरी तो विश्वचषकात खास कामगिरी करण्यात सक्षम आहे. मागील विश्वचषकात त्याने इंग्लंडविरुद्ध ७ विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.

कमकुवत बाजू – मधली फळी आणि फिरकीपटू ही सध्यातरी न्यूझीलंडची कमकुवत बाजू वाटते. टॉम लेथम, कॉलिन डी ग्रँडहोम आणि जिमी निशम हे खेळाडू अनुभवी असले तरी त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही, ही न्यूझीलंडसाठी चिंतेची बाब आहे. मिचेल सँटनर आणि इश सोधी हे फिरकीपटू आपला पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहेत. त्यामुळे ते दबावात कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

(संकलन – अन्वय सावंत)

First Published on: May 21, 2019 5:30 AM
Exit mobile version