Boxing World Championships: महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताची निखत झरीन बनली वर्ल्ड चॅम्पियन

Boxing World Championships: महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताची निखत झरीन बनली वर्ल्ड चॅम्पियन

भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. तिने इस्तंबुलमध्ये झालेल्या सामन्यात थायलंडची जुतामास जितपाँगला ५-० ने पराभव केलं आहे. या सामन्यात निखतने निर्विवाद वर्चस्व राखले आणि तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

या सामन्याच्या सुरुवातीपासून निखत आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. निखतने यावेळी प्रतिस्पर्धी जितमासला गुण पटकावण्याची एकही संधी दिली नाही. निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेता ठरलेल्या एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूंनी जागतिक जेतेपदे पटकावली आहेत. यामध्ये आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.

बॉक्सिंग हा महिलांचा खेळ नाही, असे मला सांगितले जायचे. पण ही समजूत चुकीची आहे हे मला दाखवून द्यायचे होते. यासाठी मी अथक मेहनत घेतली होती आणि ही मेहनत आज अखेर फळाला आली, असे मला वाटते, असं निखत झरीनने दमदार विजयानंतर सांगितलं.

दरम्यान, उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले होते. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.


हेही वाचा : बुडाला औरांग्या पापी म्लेंछसंव्हार जाहाला..,पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा पोस्टर जारी


 

First Published on: May 19, 2022 10:51 PM
Exit mobile version