मोठ्या बोलीचा दबाव नाही!

मोठ्या बोलीचा दबाव नाही!

पियुष चावलाचे उद्गार

भारताचा लेगस्पिनर पियुष चावलाचा गुरुवारी झालेल्या आयपीएल खेळाडू लिलावात चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात समावेश केला. चेन्नईने त्याच्यासाठी ६.७५ कोटी रुपये इतकी रक्कम मोजली. त्यामुळे तो यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. भारताकडून ३ कसोटी, २५ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामने खेळलेल्या पियुषने याआधी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

मात्र, मागील काही मोसमांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने यंदाच्या लिलावाआधी कोलकात्याने त्याला करारमुक्त केले. मात्र, आता पुढील आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळण्यास उत्सुक आहे. तसेच माझ्यावर मोठी बोली लागली याचा अजिबातच दबाव नाही, असे त्याने सांगितले.

टी-२० क्रिकेटमध्ये अनुभवाला खूप महत्त्व आहे. तुमचा संघ अडचणीत असताना अनुभवाचा खूप फायदा होतो. दोन वर्षांआधीच्या खेळाडू लिलावतही चेन्नईने माझ्यावर बोली लावली होती. मात्र, कोलकात्याने मला पुन्हा संघात समाविष्ट केले होते. मात्र, आता पुढील मोसमात चेन्नईकडून खेळण्यास मी खूप उत्सुक आहे. माझ्यावर मोठी बोली लागली याचा अजिबातच दबाव नाही. चेन्नईत फिरकीपटूंना नेहमीच मदत मिळते. त्यामुळे तिथे सर्वोत्तम खेळ करण्याचा मला विश्वास आहे, असे चावला म्हणाला.

धोनी सर्वोत्तम कर्णधार!

भारतीय संघाने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. या संघाचा पियुष चावला भाग होता. आता त्याला पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळणार आहे. याबाबत चावला म्हणाला, धोनी हा जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे. तो खूपच शांत आणि संयमी कर्णधार आहे. तसेच तो गोलंदाजांना पूर्ण मोकळीक देतो. ही गोष्ट माझ्यासाठी फायदेशीर ठरेल.

First Published on: December 21, 2019 5:36 AM
Exit mobile version