आमचा खेळ निराशाजनक!

आमचा खेळ निराशाजनक!

कर्णधार कोहलीची कबुली

आमच्या संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशजनक खेळ केला, अशी कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने दुसर्‍या कसोटी सामन्यानंतर दिली. भारताने दोन सामन्यांची ही मालिका ०-२ अशी गमावली. तसेच भारतीय फलंदाज परिस्थितीशी जुळवून घेण्यातही चुकले असे कोहलीला वाटते. या मालिकेच्या चारपैकी तीन डावांत भारताला दोनशे धावांचाही टप्पा पार करता आला नाही. तर दुसर्‍या कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या १२४ धावांतच आटोपला.

आम्ही या मालिकेत फारच निराशाजनक खेळ केला. न्यूझीलंडचा संघ आमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला खेळला असे म्हणायला हरकत नाही. आम्ही संघ म्हणून नेहमी ज्याप्रकारे खेळतो, तसे या मालिकेत खेळलो नाही. आम्ही बर्‍याच चुका केल्या आणि हे नाकारून चालणार नाही. आम्ही चुका स्वीकारल्या पाहिजेत. त्या पुन्हा होणार नाहीत यावर लक्ष दिले पाहिजे. या मालिकेत आम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. आम्ही यासाठी पूर्णपणे तयार नव्हतो. आम्ही निडरपणे आणि सकारात्मक पद्धतीने खेळलो नाही, असे कोहलीने स्पष्ट केले.

केवळ पंतवर टीका नको!

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून वृद्धिमान साहाऐवजी युवा रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला केवळ ६० धावा करता आल्या, तसेच त्याने झेलही सोडले. त्यामुळे पंतवर पुन्हा टीका होत आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहलीला हे फारसे आवडलेले नाही. ऑस्ट्रेलियन दौर्‍याच्या सुरुवातीपासून आम्ही पंतला बर्‍याच संधी दिल्या आहेत. काही सामने त्याला संघाबाहेरही बसावे लागले. या दरम्यान त्याने खूप मेहनत घेतली आहे. मात्र, दुसर्‍या खेळाडूला संधी देण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही विचार केला पाहिजे. या मालिकेत आमच्या संघानेच चांगला खेळ केला नाही. त्यामुळे केवळ पंतवर टीका करणे योग्य नाही, असे कोहली म्हणाला.

…आणि कोहली भडकला!

दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहलीने जोरदार जल्लोष केला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका स्थानिक पत्रकाराने कोहलीला याबाबत विचारले. तू विल्यमसनला शिवी दिलीस, त्याबाबत काय सांगशील. भारतीय कर्णधार म्हणून तू मैदानावर अशाप्रकारे वागणे योग्य आहे का, असा प्रश्न पत्रकाराने कोहलीला केला. तुला काय वाटते, तूच उत्तर दे, असे कोहली त्याला म्हणाला. मी तुला प्रश्न विचारला आहे, असे पत्रकाराने प्रत्युत्तर दिले. यावर कोहली म्हणाला की, तू उत्तर शोधून यापेक्षा चांगला प्रश्न विचार. अर्धवट प्रश्न आणि अर्धवट माहितीने तू इथे येऊ शकत नाहीस. वाद निर्माण व्हावा अशी तुझी इच्छा असेल, तर ही योग्य जागा नाही. मी सामानाधिकार्‍यांशी (रंजन मधुगले) संवाद साधला आहे आणि त्यांना काहीही आक्षेप नव्हता.

First Published on: March 3, 2020 5:21 AM
Exit mobile version