आमच्या संघाची कामगिरी निराशाजनक!

आमच्या संघाची कामगिरी निराशाजनक!

अफगाणिस्तानचा कर्णधार नैबची टीका

अफगाणिस्तानच्या संघाला क्रिकेट विश्वचषकात चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. त्यांना आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता येणार नाही हे निश्चित झाले आहे. मात्र, या संघाने काही सामन्यांमध्ये झुंजार खेळ केल्याचे पाहायला मिळाले. हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असणार्‍या भारताला त्यांनी अवघ्या २२४ धावांवर रोखले होते, पण फलंदाजांनी गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फिरवले.

बांगलादेशविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पुन्हा पराभव झाला. या सामन्यात त्यांनी ढिसाळ क्षेत्ररक्षण करूनही बांगलादेशला २६२ धावाच करता आल्या. फलंदाजांनी या सामन्यातही खराब प्रदर्शन केल्यामुळे अफगाणिस्तान ६२ धावांनी पराभूत झाला. त्यामुळे या सामन्यानंतर कर्णधार गुलबदीन नैबने संघाच्या कामगिरीवर टीका केली.

बांगलादेशविरुद्ध आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता असे मला वाटले. मात्र, आमची या सामन्यातील कामगिरी निराशाजनक होती. आम्ही काही झेल सोडले आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण करत जास्त धावाही दिल्या. आम्ही ३०-३५ धावा वाचवू शकत होते, असे मला वाटते. ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे आम्ही चांगली संधी गमावली. तसेच सुरुवातीच्या १० षटकांमध्ये आम्ही खराब गोलंदाजी केली. बांगलादेशने अगदी सहज ५० वैगरे धावा केल्या. फलंदाजांनाही चांगले प्रदर्शन करता आले नाही. या सामन्याच्या खेळपट्टीवर २६३ धावा होऊ शकल्या असत्या, असे नैब म्हणाला.

या सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसनने अफलातून अष्टपैलू कामगिरी करताना फलंदाजीत ५१ धावा आणि गोलंदाजीत ५ विकेट्स घेतल्या. हा सामना बांगलादेशने जिंकला याचे श्रेय शाकिबलाच जाते, असे सामन्यानंतर नैबने सांगितले. शाकिबने खूप चांगली गोलंदाजी केली. तो अष्टपैलू खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तसेच त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे. त्यामुळे त्याने योजनेनुसार गोलंदाजी करत फलंदाजांना अडचणीत टाकले.

मी टीम इंडियाचा चाहता – नैब

विराट कोहलीच्या भारतीय संघाने अफगाणिस्तानचा अवघ्या ११ धावांनी पराभव केला होता. हा सामना जिंकता न आल्याचे नैबला दुःख आहे. मात्र, भारत हा माझा सर्वात आवडता संघ आहे, असेही नैब म्हणाला. भारत हा सर्वात आवडता संघ आहे. मी या संघाचा चाहता आहे. मी जेव्हा सामना पाहत असतो, तेव्हा त्यांनाच पाठिंबा दर्शवतो. विराट कोहली हा माझा सर्वात आवडता फलंदाज आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि त्याच्याविरुद्ध मला या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, असे नैबने सांगितले.

First Published on: June 26, 2019 4:34 AM
Exit mobile version