PV Sindhu : पी.व्ही. सिंधूचा इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

PV Sindhu : पी.व्ही. सिंधूचा इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने गुरूवारी झालेली पहिली फेरी गमावल्यानंतर जोरदार कमबॅक करत स्पेनच्या क्लारा अजुर्मेंडीचा पराभव करून इंडोनेशियाच्या मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ४७ व्या क्रमांकावर असलेल्या क्लाराविरूध्द पहिल्यांदाच खेळताना सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात १७-२१, २१-७, २१-१२ अशा फरकाने विजय मिळवला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेल्या तुर्कीच्या नेस्लिहान यिगितविरूध्द खेळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे सिंधूने तुर्कीच्या खेळाडूविरूध्द आतापर्यंत तिचे तीनही सामने जिंकले आहेत.

मात्र युवा लक्ष्य सेन पुरुष एकेरीत पराभूत झाला होता, तर ध्रुव कपिला आणि एन सिक्की रेड्डी या जोडीला मिश्र दुहेरीच्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. नुकत्याच पार पडलेल्या हाइलो ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि डच ओपनच्या अंतिम फेरीत जागा मिळवणाऱ्या लक्ष्यला क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या आणि दोन वेळेचा विश्वविजेता राहिलेल्या जपानच्या केंटो मोमोटाकडून ४६ मिनिटांत १३-२१, १९-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. कपिला आणि सिक्कीला मिश्रित युगलच्या दुसऱ्या फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात सुपाक जोमकोह आणि सुपिसारा पेवसाम्प्रानच्या या थायलंडच्या जोडीविरूध्द तीन गेममध्ये १५-२१, २३-२१, १८-२१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणयने शानदार प्रदर्शन करत विजय मिळवून बुधवारी इंडोनेशिया मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. काही काळ जागतिक पातळीवर एक नंबरवर राहिलेल्या श्रीकांतने पहिल्या फेरीतील सामन्यात जागतिक क्रमवारीत ७१ व्या स्थानी असलेल्या फ्रांन्सच्या क्रिस्टो पोपोवचा २१-१८, १५-२१, २१-१६ असा पराभव केला. हा सामना तब्बल १ तास १५ मिनिटे चालू होता. तर जागतिक पातळीवर १० व्या नंबरवर राहिलेल्या प्रणयने पहिल्या फेरीत मलेशियाच्या डेरेन ल्यूचाला २२-२०,२१-१९ अशा फरकाने धूळ चारली.

सध्या जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतचा पुढच्या फेरीत ६ व्या स्थानी असलेल्या जोनाथन क्रिस्टीसोबत सामना होणार आहे. अशातच पुढच्या सामन्यात प्रणयसाठी मोठे आव्हान असणार आहे. कारण त्याचा सामना ऑलिम्पिक विजेता आणि डेनमार्कच्या दुसऱ्या स्थानी असलेल्या विक्टर एक्सेलसन सोबत होणार आहे.


हे ही वाचा: AB de Villiers retires : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा


 

First Published on: November 19, 2021 3:28 PM
Exit mobile version