लोकांना वाटते मी संपलो,पण मला फरक नाही पडत!

लोकांना वाटते मी संपलो,पण मला फरक नाही पडत!

कुस्तीपटू सुशीलचे विधान

लोकांना माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय आहे. त्यांना वाटते मी संपलो, पण त्यांच्या मताने मला फरक पडत नाही, असे विधान भारताचा अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारने केले. तसेच ३६ वर्षीय सुशील आपण निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले असून पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकची तो तयारी करत आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके (२००८ कांस्य, २०१२ रौप्य) मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू असणार्‍या सुशीलला टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणे अवघड जाणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी होणारी ही स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या सुशीलच्या आशा जिवंत झाल्या आहेत.

माझा सध्या तरी निवृत्तीचा अजिबातच विचार नाही. मला आता अधिक वेळ मिळाला आहे आणि अधिक वेळ म्हणजे अधिक चांगली तयारी. कुस्ती हा असा खेळ आहे की, ज्यात तुम्हाला दुखापत झाली नाही, तुम्ही नीट सराव केला, समोर ध्येय ठेवले आणि मेहनत घेतली, तर तुमच्याकडे ध्येय गाठण्याची चांगली संधी असते. मी आजही दिवसातून दोन वेळा सराव करतो. मी आता गादीवर (मॅट) सराव करत नाही, पण फिट राहण्याचा प्रयत्न करत आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची मला आशा आहे, असे सुशील म्हणाला.

२०१९ जागतिक स्पर्धेत पुनरागमन करताना सुशीलने चांगली सुरुवात केली होती. परंतु, नंतर त्याचा खेळ खालावला आणि त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. सुशील ७४ किलो वजनी गटात खेळतो आणि या गटातून अजून कोणताही कुस्तीपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे त्याला अजूनही संधी आहे. मात्र, त्याचे वय लक्षात त्याला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे अवघड जाऊ शकेल असे लोकांना वाटते. याबाबत सुशीलने सांगितले, लोक २०११ मध्येही याच गोष्टी बोलत होते. मात्र, परिस्थिती कशी हाताळायची हे मला ठाऊक आहे.

नरसिंगचे अभिनंदन
जुलै महिन्याच्या अखेरीस भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादववर लावण्यात आलेली चार वर्षांच्या बंदीची शिक्षा संपुष्टात येणार आहे. टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे गेल्याने त्याला या स्पर्धेसाठीही पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. परंतु, ७४ किलो वजनी गटात नरसिंग पुन्हा त्याचा जुना प्रतिस्पर्धी सुशील कुमारचे आव्हान असेल. सुशील आणि नरसिंग यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. ऑलिम्पिक पात्रतेसाठी या दोघांमध्ये चाचणी लढत होऊ शकेल. याबाबत सुशील म्हणाला, मी आता काहीही बोलू शकत नाही. मात्र, मी नरसिंगचे अभिनंदन करु इच्छितो. त्याला त्याची कारकीर्द पुन्हा सुरु करण्याची संधी मिळणार आहे.

First Published on: April 7, 2020 6:19 AM
Exit mobile version