प्रीमियर लीग : लेस्टर सिटीची क्रिस्टल पॅलेसवर मात

प्रीमियर लीग : लेस्टर सिटीची क्रिस्टल पॅलेसवर मात

जेमी वार्डी आणि कॅग्लर सोयुंचूने केलेल्या गोलच्या जोरावर लेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात क्रिस्टल पॅलेस संघाचा २-० असा पराभव केला. हा लेस्टरचा अकरा सामन्यांतील सातवा विजय होता. त्यामुळे त्यांनी २३ गुणांसह प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे. गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणार्‍या लिव्हरपूलच्या खात्यात ३१, तर दुसर्‍या स्थानी असणार्‍या मँचेस्टर सिटीच्या खात्यात २५ गुण आहेत. लेस्टरने आपल्या मागील सामन्यात साऊथहॅम्पटनचा ९-० असा धुव्वा उडवला होता. मात्र, त्यांना क्रिस्टल पॅलेसविरुद्ध विजय मिळवण्यासाठी झुंजावे लागले.

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी भक्कम बचाव केला. त्यामुळे कोणत्याही संघाला पहिली १५ मिनिटे गोलची संधी मिळाली नाही. या सामन्याच्या १८ व्या मिनिटाला लेस्टरच्या जेमी वार्डीने मारलेला फटका पॅलेसचा गोलरक्षक ग्वेटाने अडवला. यानंतर जॉनी इव्हन्सलाही गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे मध्यंतराला या सामन्यात गोलशून्य बरोबरी होती.

मध्यंतरानंतर मात्र लेस्टरने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला लेस्टरला कॉर्नर किक मिळाली. जेम्स मॅडिसनच्या क्रॉसवर कॅग्लर सोयुंचूने हेडर मारत गोल केला आणि लेस्टरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा सोयुंचूचा लेस्टरसाठी पहिला गोल होता. यानंतर पॅलेसने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना गोलसाठी संधी निर्माण करता आल्या नाहीत. लेस्टरने मात्र आक्रमक खेळ सुरू ठेवला. सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला डिमारी ग्रेच्या पासवर जेमी वार्डीने गोल करत लेस्टरला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना जिंकला.

एव्हर्टन-टॉटनहॅम सामन्यात बरोबरी

एव्हर्टन आणि टॉटनहॅम या संघांमधील प्रीमियर लीगचा सामना १-१ असा बरोबरीत संपला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, उत्तरार्धात हा सामना चुरशीचा झाला. ६३ व्या सॉन ह्युंग मिनच्या पासवर डेली अलीने केलेल्या गोलमुळे टॉटनहॅमला १-० अशी आघाडी मिळाली. या सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला सॉनला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे उर्वरित सामन्यात टॉटनहॅमला १० खेळाडूंनी खेळावे लागले. याचा फायदा एव्हर्टनला झाला. सामना संपायला काही मिनिटेच शिल्लक असताना एव्हर्टनच्या चेंक टोसूनने गोल केला. त्यामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

First Published on: November 5, 2019 5:23 AM
Exit mobile version