मेरी कोमचा सुवर्ण पंच

मेरी कोमचा सुवर्ण पंच

भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा जागतिक चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोमने इंडोनेशियामध्ये झालेल्या २३ व्या प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मेरीने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँक्सवर ५-० अशी सहज मात केली. ३६ वर्षीय मेरीने मे महिन्यात झालेल्या इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते. मात्र, पुढील वर्षी टोकियोमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेच्या तयारीसाठी ती आशियाई स्पर्धेत खेळली नव्हती. आशियाई स्पर्धा मे महिन्यात थायलंडमध्ये झाली होती.
दोन महिन्यांपूर्वीच सुवर्णपदक मिळवणार्‍या मेरीने जागतिक स्पर्धेपूर्वी सरावासाठी प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला आणि तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सहज धूळ चारत सुवर्णपदक पटकावले. मागील वर्षी दिल्लीमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्ण मिळवणार्‍या मेरीचे यावर्षी रशियामध्ये होणार्‍या या स्पर्धेत सुवर्ण मिळवून २०२० ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचे लक्ष्य आहे. यंदा महिलांसाठी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत येकातेरींबर्ग, रशिया येथे होणार आहे.

First Published on: July 29, 2019 4:49 AM
Exit mobile version