World Tour Finals : अखेरच्या साखळी सामन्यात सिंधू विजयी; स्पर्धेतून मात्र आऊट 

World Tour Finals : अखेरच्या साखळी सामन्यात सिंधू विजयी; स्पर्धेतून मात्र आऊट 

पी. व्ही. सिंधू

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेची विजयी सांगता करण्यात यश आले. तिने महिला एकेरीच्या अंतिम साखळी सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉन्गचा २१-१८, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. मात्र, तिला स्पर्धेत आगेकूच करण्यात अपयश आले. सुरुवातीचे दोन साखळी सामने गमावल्याने सिंधूचे आव्हान साखळीत संपुष्टात आले. तिला पहिल्या साखळी सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या ताय झू यिंगने, तर दुसऱ्या सामन्यात थायलंडच्या रॅटचनॉक इंटानोनने पराभूत केले होते. तसेच तिन्ही साखळी गमावणारा किदाम्बी श्रीकांतही आगेकूच करू शकला झाला.

सिंधूची चोचूवॉन्गवर मात

सिंधूने या स्पर्धेची सुरुवात सलग दोन पराभवांनी केली होती. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात सिंधूने चांगला खेळ केला. तिने पोर्नपावी चोचूवॉन्गवर २१-१८, २१-१५ अशी मात केली. ‘कोरोनानंतर झालेल्या तिन्ही स्पर्धांमध्ये मला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, पराभवांमधून मला खूप शिकायला मिळाले,’ असे अखेरच्या साखळी सामन्यानंतर सिंधू म्हणाली.

श्रीकांत पुन्हा पराभूत

पुरुष एकेरीत श्रीकांतने अखेरच्या साखळी सामन्यातही निराशा केली. त्याला हाँगकाँगच्या लॉंग अँगसने २१-१२, १८-२१, १९-२१ असे पराभूत केले. या स्पर्धेत श्रीकांतचा हा सलग तिसरा पराभव ठरला. त्याआधी श्रीकांतला पहिल्या साखळी सामन्यात डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसनने, तर दुसऱ्या सामन्यात तैवानच्या वांग झू वेने पराभूत केले होते.


हेही वाचा – IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरला ‘हा’ संघ करणार खरेदी? 


 

First Published on: January 29, 2021 9:08 PM
Exit mobile version