राहुल द्रविडमुळे भारतीय क्रिकेट योग्य मार्गावर; माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केले कौतुक

राहुल द्रविडमुळे भारतीय क्रिकेट योग्य मार्गावर; माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केले कौतुक

NCA अध्यक्षपदासाठी राहुल द्रविडचा पुन्हा अर्ज

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाकडून प्रेरणा घेत भारतीय क्रिकेटमध्ये काही बदल घडवून आणले. त्याच्या या प्रयत्नांमुळे भारतीय क्रिकेट आता योग्य मार्गावर असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले. द्रविड खेळण्यातून निवृत्त झाल्यानंतर त्याने भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. या दोन्ही संघांमध्ये द्रविडचे मार्गदर्शन लाभलेले बरेच खेळाडू भारताच्या सिनियर संघाकडून खेळत आहेत. तसेच द्रविड आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद भूषवत असून तो भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. त्यामुळे त्याचे चॅपल यांनी कौतुक केले.

ऑस्ट्रेलियाकडून घेतली प्रेरणा 

भारतीय क्रिकेट आता योग्य मार्गावर असून याचे प्रामुख्याने श्रेय द्रविडला जाते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून प्रेरणा घेत भारतीय क्रिकेटला योग्य दिशा दिली. भारताकडे असंख्य प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम द्रविडने केले. त्यामुळे आता भारताची मजबूत राखीव फळी तयार झाली आहे, असे चॅपल म्हणाले. प्रतिभावान खेळाडू शोधून, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करण्याच्या बाबतीत आता भारत आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे, असेही चॅपल यांना वाटते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार

यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बन कसोटीत भारतीय संघाने तीन-चार नवख्या खेळाडूंना संधी दिली होती. हा भारताचा दुय्यम संघ असल्याचे त्यावेळी म्हटले गेले. परंतु, या नवख्या खेळाडूंना भारत ‘अ’ संघाकडून केवळ भारतात नाही, तर विविध देशांमध्ये खेळण्याचा अनुभव होता. त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार होते, असेही चॅपल म्हणाले.

First Published on: May 12, 2021 5:14 PM
Exit mobile version